Pune Crime News | बांधकाम व्यावसायिकाला पावणे चार कोटींचा घातला गंडा; तारा डिऑन प्रकल्पातील बांधकाम करुन घेऊन परस्पर विकले फ्लॅट
पुणे : Pune Crime News | आय टी कंपनीतील नोकरीनिमित्त पती पत्नी पुण्यात आले. पुढे पती नोकरी सोडून बांधकाम व्यावसायात उतरले. बंद पडलेल्या प्रकल्पात गुंतवणुक केली. शिवतारा प्रॉपर्टीजच्या संचालकांनी त्यांच्याकडून बांधकाम करुन घेऊन नफ्यात वाटा न देता ३ कोटी ७१ लाख ९० हजार ३३४ रुपयांची फसवणूक केली.
याबाबत लोकेश सिंग सेनगर (वय ४२, रा. ऑर्किड पार्क स्प्रिंग्ज बिल्डिंग, लोहगाव) यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शिवतारा प्रॉपर्टीजचे (Shivtara Properties) संचालक निलेश शिवजी सिंग Nilesh Shivji Singh (रा. कॅनॉट प्लेस, बंडगार्डन) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २० ऑगस्ट २०२१ ते मार्च २०२३ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुळचे इंदौरचे राहणारे आहेत. आय टी कंपनीमध्ये त्यांची निवड झाल्याने ते २००५ मध्ये पुण्यात आले. त्यांची पत्नीही आय टी कंपनीमध्ये आहे. त्यांनी नोकरी व बचतीतून सचिन खांदवे, प्रविण खांदवे यांच्याकडून २०१४ मध्ये लोहगाव येथील ११ गुंठे जागा ८० लाखांमध्ये घेतली होती. त्यानंतर ते नोकरीनिमित्त कॅनडाला गेले. २०१८ मध्ये ते परत आले. त्यांची ११ गुंठे जागा दोघा भावांना अर्धी अर्धी विकसनासाठी द्यावयाची. त्याबद्दल दोघे भाऊ प्रत्येकी एक कोटी रुपये देणार होते. त्यांचे मित्र सचिन खेसे यांची ओळख झाली.
निलेश सिंग याची शिवतारा प्रॉपर्टीज ही कंपनी असून त्यांचे मुंढवा येथे गृहप्रकल्प सुरु आहे. कामाला पैसे अपुरे पडल्याने काम बंद पडले आहे, असे समजले. सेनगर यांनी या प्रकल्पात पैसे गुंतवण्याचे ठरविले. या प्रकल्पात एकूण ३६ फ्लॅट पैकी निलेश सिंग यांना १९ फ्लॅट, २ पॅन्ट हाऊस व ८ गाळे मिळणार तर राजगोपालन यांना १७ फ्लॅट असे ठरलेले होते. निलेश सिंग याने या प्रकल्पात पैसे गुंतवले तर त्यांच्या हिश्शातील ५० टक्के फायदा देऊ , असा प्रस्ताव ठेवला. त्यांना फ्लॅटधारकांकडून ५ कोटी ३३ लाख येणार असल्याचे सांगितले.
त्यानुसार त्यांनी या प्रकल्पात ४ कोटी ९ लाख रुपये गुंतविले. त्यापैकी ३८ लाख रुपये निलेश सिंग याने त्यांना परत केले. प्रत्यक्षात फ्लॅटधारकांकडून निलेश सिंग याने अगोदरच पैसे घेतले होते. प्रकल्पासंदर्भात झालेले पार्टशिनशिप डीड हे बनावट कागदपत्रे आहेत. निलेश सिंग याने मोठी आर्थिक फसवणुक केल्याचे लक्षात आले. त्यांनी वारंवार यामध्ये गुंतविलेली रक्कम परत देण्याची मागणी केली. त्यावेळी त्याने फिर्यादी व त्यांच्या पत्नीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. १० जुलै २०२३ रोजी सायंकाळी ते तारा डिऑन या साईटवर गेले असताना निलेश सिंग व त्याच्या ३ साथीदारांनी त्यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. त्यानंतर आता त्यांनी ३ कोटी ७१ लाख ९० हजार रुपयांची फसवणुक केल्याची फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम तपास करीत आहेत.
