Pune Crime News | प्रवाशांचे मोबाईल हिसकावुन नेणार्‍या सराईत चोरट्याला पकडून बंडगार्डन पोलिसांनी 3 गुन्हे आणले उघडकीस

New Project (13)

पुणे : Pune Crime News | पुणे रेल्वे स्टेशनसमोरील शिंदे वाहनतळासमोरील कात्रज बसस्टॉपकडे चालत जात असलेल्या प्रवाशाच्या हातातील मोबाईल हिसकावून नेणार्‍या सराईत चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून २ मोबाईल व एक मोटारसायकल असे ३ गुन्हे उघडकीस आणून ७० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

अर्जुन हिराजी भोसले Arjun Hiraji Bhosale (वय २३, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्यावर पुणे शहरात विविध ठिकाणी ९ गुन्हे दाखल आहेत. त्याचा साथीदार पळून गेला आहे.

रविशंकर बंडप्पा खुबा (वय ३१, रा. कात्रज चौक, कात्रज) हे ३ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता पुणे रेल्वे स्टेशनसमोरील शिंदे वाहनतळाकडून समोरील कात्रज बसस्टॉपकडे जात होते. भावाला फोन करण्यासाठी त्यांनी खिशातून मोबाईल काढला. त्यावेळी दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावला. ते बोल्हाई चौकाच्या दिशेने निघून गेले. बंडगार्डन पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात खुबा यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेणार्‍या चोरट्यांनी विनानंबरप्लेटची मोटारसायकल वापरल्याचे दिसून आले. ही मोटारसायकल व त्यावरुन मिळालेल्या वर्णनाच्या चोरट्यांचा शोध घेत असताना त्यांना विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरुन एक जण जाताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याच्याकडील मोटारसायकल ही राजगड पोलीस ठाण्यातून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले.

हरीश रतनलाल पटेल (वय २०, रा. मोहननगर, धनकवडी) हे ३ नोव्हेंबर रोजी पहाटे पुण्यात आले होते. पुणे स्टेशवरुन ते स्वारगेटला आले. स्वारगेट बसस्थानकाबाहेर पहाटे साडेचार वाजता ते मित्राला फोन करत असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला होता. स्वारगेट येथून मोबाईल चोरल्यानंतर ते पुणे स्टेशनला आले. तेथे त्यांनी दुसरा मोबाईल हिसकावून घेतला होता. बंडगार्डन पोलिसांनी हे दोन मोबाईल आणि मोटारसायकल असा ७० हजाराचा माल जप्त केला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त संगिता आल्फासो शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, गणेश चव्हाण, मोहन काळे, पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड, बाळासाहेब भांगरे, तुकाराम हिवाळे यांनी केली आहे.

You may have missed