Pune Crime News | पीडीसीसीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमनची ओळख सांगून बँकेत नोकरीला लावण्याच्या बहाण्याने 2 लाखांची फसवणूक करणार्यास बंडगार्डन पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | पीडीसीसी बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन यांची ओळख असल्याचे सांगून बँकेत लिपिक म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून २ लाख रुपये घेऊन बनावट अपॉईमेंट लेटर देऊन फसवणूक करणार्यास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. बँकेच्या व्हाईस चेअरमनची अॅसिस्टंट म्हणून आपल्या पत्नीचे बँक खाते दिल्याचे तपासात समोर आले आहे.
ऋषिकेश गणेश वाघमारे Rishikesh Ganesh Waghmare (वय २७, रा. सपकाळवाडी, इंदापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत कासारवाडी येथील एका ३८ वर्षाच्या नागरिकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पत्नी ही एम कॉम झाली असून तिच्या नोकरीचे काम ऋषिकेश वाघमारे हा करुन देईन, असे ओळखीच्या एकाने सांगितले. त्यानुसार ते नोव्हेंबर २०२५ मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे गेले होते. तेथे ऋषिकेश वाघमारे भेटला. त्याने बँकेचे व्हाईस चेअरमन सुनिल चांदेरे व चेअरमन दिगंबर दुर्गाडे यांच्याशी चांगली ओळख असल्याचे सांगितले. यापूर्वी अनेक मुलांना पीडीसीसी बँकेमध्ये क्लर्क पदावर नोकरीस लावले असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्या पत्नीला क्लर्क पदावर नोकरीला लावून देतो, असे सांगून त्यासाठी ७ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यापैकी २ लाख रुपये अपॉईमेंट लेटर देण्यापूर्वी व उर्वरित ५ लाख जॉईनिंग झाल्यानंतर द्यावे लागतील, असे सांगितले. त्यांनी तयारी दर्शविल्यावर ऋषिकेश वाघमारे याने सुनिल चांदेरे यांना त्यांचे मोबाईलवरुन फोन करुन बोलणे करुन घेतले.
त्यामुळे फिर्यादी यांचा त्याच्यावर विश्वास बसला. ऋषिकेश वाघमारे याने व्हाईस चेअरमन सुनिल चांदेरे यांच्या अॅसिस्टंट पुजा मंगेश ढगारे यांच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी २ लाख रुपये पाठविले. त्यानंतर त्यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर वाघमारे याने २४ नोव्हेबर २०२५ रोजी पीडीसीसी बँकेच्या मुख्य कार्यालयात बोलावून घेतले. तेथे बँकेच्या लेटरहेडवर पत्नीचे नाव व ८ जानेवारी ते १० मार्च २०२६ रोजी पर्यंतचे लिपीक या पदावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देत असल्याबाबत कार्यकारी मुख्याधिकारी अनिरुद्ध देसाई यांच्या सहीचे अपॉईमेंट लेटर दिले. फिर्यादी ते लेटर घेऊन घरी आल्यावर त्या लेटरवर बँकेचा शिक्का नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला बँकेकडील ई मेलद्वारे अपॉईमेंट लेटर पाठविण्यास सांगितले. त्याने लेटर न पाठविल्यामुळे ऋषिकेश वाघमारे याने बनावट अपॉईमेंट लेटर देऊन फसवणूक केल्याचे लक्षात आले.
बंडगार्डन पोलिसांनी ऋषिकेश वाघमारे याला अटक केली. त्याने व्हाईस चेअरमन सुनिल चांदेरे यांच्या अॅसिस्टंट म्हणून पुजा मंगेश ढगारे यांचे बँक खाते दिले होते. अशा पुजा कोणी बँकेत कामाला नाहीत. तर ते बँक खाते त्याच्या पत्नीचेच आहे. अधिक तपासासाठी न्यायालयाने २ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
