Pune Crime News | विमान प्रवासाला जाताना बॅगेत लायटर ठेवणे पडले महागात; लायटरबरोबर दोन पुड्या आल्या बाहेर, गांजा बाळगल्याने IT मधील तरुणावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | डोमॅस्टिक विमान प्रवासात बॅग चेक करत नाही, हा समज आयटी मध्ये नोकरी करणार्या तरुणाला खूप महागात पडला. खराडी येथील आय टी कंपनीत नोकरी करणारा तरुण उत्तर प्रदेशातील गावी जात होता. विमानतळावर बॅगेची तपासणी करताना त्यात लायटर सापडले. कर्मचारी बॅगेतून लायटर काढत असताना त्याबरोबर दोन प्लॉस्टिकच्या पुड्या मिळाल्या. त्या गांज्याच्या पुड्या असल्याचे आढळून आले. विमानतळ पोलिसांनी या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
अमित जियालाल प्रजापती Amit Jiyalal Prajapati (वय २८, रा. गुलमोहर सिटी, खराडी रोड, मुळ रा. जगदिशपूर, ता. निझामाबाद, जि. आझमगड, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत सुजीत बालाजी कागणे (वय ३५, रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार विमानतळावरील बॅग चेकिंग येथे ११ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित प्रजापती हा एका आय टी कंपनीत कामाला आहे. तो पुणे ते वाराणसी या इंडिगोच्या विमानाने गावी जात होता. त्याने बॅग चेक करण्यासाठी दिल्या. फिर्यादी यांनी बॅग चेक केली. तेव्हा मशीनमध्ये एका बॅगमध्ये लायटर असल्याचे लक्षात आले. त्यांनी ही बॅग रिजेक्ट केली प्रत्यक्ष बॅग चेक करण्यासाठी दुसर्या ठिकाणी पाठविली. बॅगेमध्ये लायटर व दोन प्लास्टिकच्या पुड्यांमध्ये गांजा आढळून आला. त्याचे वजन केले असता तो १२ ग्रॅम असल्याचे दिसून आले.
डोमॅस्टिक विमान प्रवासात बॅगांची तपासणी करत नाही, असा समज असल्याने त्याने लायटर व गांजा बॅगेत ठेवला होता. लायटरमुळे बॅगेतील गांजाही सापडला. विमानतळ पोलिसांनी हा गांजा जप्त करुन प्रजापती याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक माने तपास करीत आहेत.
