Pune Crime News | हडपसरमधील सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड करणार्या 8 जणांवर गुन्हा दाखल (Video)
पुणे : Pune Crime News | रुग्णाच्या निधनानंतर हडपसरमधील सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड करणार्या ८ जणांवर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत रुग्णालयातील अधिकारी अभिजित अंकुश शिवणकर (वय ४२) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अजय केरु सपकाळ, शुभम संजय सपकाळ, कुणाल हनुमंत सकपाळ, गौरव गणेश सकपाळ, विश्वजीत कुंडलिक कुमावत, मंगेश दत्तात्रय सपकाळ, वैभव हनुमंत सपकाळ, विनायक अजय सपकाळ (सर्व रा. उद्योगनगर, महंमदवाडी, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये, मालमत्तेची हानी किंवा नुकसान) यांना प्रतिबंध कायदा -२०१० कलम ३ आणि ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वैद्यकीय कक्षाचे शहरप्रमुख अजय सपकाळ यांचे वडिल केरु सपकाळ (वय ७६)यांच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचे २८ नोव्हेंबर रोजी अल्सरची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर दोन दिवसात ते व्यवस्थित झाले. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या फुफ्फुसात पाणी झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले नाही. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेले व बुधवारी त्यांचे निधन झाले. डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचा आरोप सपकाळ यांच्या कुटुंबियांनी केला त्यानंतर संतप्त झालेल्या सपकाळ यांचा मुलगा याने अन्य आरोपींना चिथावणी दिली. रुग्णालयात तोडफोड केली. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचार्यांना शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
शिवणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक परवेज शिकलगार तपास करत आहेत.
