Pune Crime News | पेट्रोल पंपाचा व्यवहार लवकर पूर्ण करण्यासाठी महिलेला धमकी दिल्याप्रकरणी अली दारुवाला यांच्यावर गुन्हा दाखल

Pune Crime News | Case registered against Ali Daruwala for threatening a woman to complete the petrol pump transaction quickly

पुणे : Pune Crime News |  स्वारगेट येथील पेट्रोल पंपाचा लवकर व्यवहार पूर्ण करावा, यासाठी महिलेला धमकी देऊन त्यांना गाडी बाहेर काढण्यासाठी प्रतिबंध केल्याप्रकरणी भाजपचे प्रवक्ते आणि पेट्रोल डिलर्स असोशिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मोशी नागरकट्टी मालविया (वय ४७, रा. मीरा सोसायटी, शंकरशेठ रोड) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अली दारुवाला (वय ५०) व त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पुना क्लब येथील स्वीमिंग पुलच्या पार्किंगमध्ये ३० जानेवारी रोजी रात्री ९ वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी मालविया यांच्या आईवडिलांच्या नावावर स्वारगेट येथे पेट्रोल पंप होता. पेट्रोल डिलर्स असोशिएशनचे पदाधिकारी असल्याने त्यांची अली दारुवाला यांच्याशी ओळख होती. अली दारुवाला यांच्या सांगण्यावरुन मोशी मालविया यांनी हर्षद गोल्वा यांना पेट्रोल पंप विकला आहे. दरम्यान, कंपनीचे धोरण बदलल्याने हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही.

मोशी मालविया या ३० जानेवारी रोजी पुना क्लबमध्ये गेल्या होत्या. रात्री क्लबमधून बाहेर पडताना त्या पार्किंगमध्ये आपली चारचाकी गाडी घेण्यासाठी गेल्या. तेथे अली दारुवाला व दोघे जण उभे होते. त्यांनी मालविया यांनी पार्क केलेल्या चारचाकी गाडी मागे दुचाकी आडवी लावली होती. मालविया यांना गाडी बाहेर काढण्यासाठी प्रतिबंध केला. त्यांनी अली दारुवाला यांना विचारणा केल्यावर त्यांनी हर्षद गोल्वा यांच्यासोबतचा पेट्रोल पंपाचा लवकर व्यवहार पूर्ण करण्यासाठी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक पुजा मदने तपास करीत आहेत.

You may have missed