Pune Crime News | इन्फिस्को शेअर मार्केटिंग कंपनीच्या भूपेश दीक्षितविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | दर महिन्याला ४ ते १० टक्क्यापर्यंत परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांची साडेआठ कोटी रुपयांची फसवणूक करणार्या इन्फिस्को शेअर मार्केट कंपनीचे भुपेष अशोक दीक्षित याच्यावर दाखल झालेला गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
भुपेश अशोक दीक्षित Bhupesh Ashok Dixit (वय ४०, रा. कुमार प्रेसिडेन्सी, कोरेगाव पार्क) याने कोरेगाव पार्कमध्ये कार्यालय उघडून तेथे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास कशा पद्धतीने जास्तीतजास्त परतावा मिळू शकतो, असे प्रेझेंटेशन दाखवून लोकांना भुलवत होता. सुरुवातीला काही महिने तो लोकांना परतावा देत होता. त्यातून इतर लोकही त्याच्याकडे गुंतवणुक करत होते. फेब्रुवारी २०२५ पासून लोकांना परतावा देणे बंद झाले. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केल्यावर तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. शेवटी फिर्यादी यांच्यासह १७ लोकांची कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात ६ ऑक्टोंबर २०२५ रोजी ८ कोटी ३४ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक उत्कर्षा देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
हा गुन्हा आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. भुपेश दीक्षित याच्याकडून आर्थिक फसवणूक झाली असल्यास संबंधित कागदपत्रे व पुराव्यासह आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
