Pune Crime News | टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | टिपू सुलतान हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  समकक्ष समजले पाहिजे, असे म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नवा वाद निर्माण केला आहे. रविवारी राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपच्या वतीने आंदोलन केले जाते आहे. त्याचवेळी पुण्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचे शहराध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे (वय ५१, रा. साने गुरुजीनगर) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मालेगाव महापालिकेत उपमहापौर व समाजवादी पार्टीच्या नेत्या शान ए हिंद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरुन राज्यभरात वाद निर्माण झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे टिपू सुलतान यांनीही इंग्रजाविरुद्ध लढा दिला व त्यांनी वीर अशा योद्धयाचे रुप दाखविले. त्यामुळे त्यांच्या शौर्याची किंमत पाहता त्याना छत्रपती शिवाजी महाराजांशी समकक्ष मानले जाऊ शकते, असे म्हटले. त्यानंतर हा वाद सुरु झाला.

भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे, की ते त्यांचे मोबाईलवर सोशल मीडिया पाहत असताना एक क्लिप व्हायरल झाली. त्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान याची छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुलना करुन आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने छत्रपती शिवाजी महाराज यांना दैवत मानणार्‍या सर्वांच्या भावना दुखावल्या असून आरोपींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला आहे. त्यांचे हे विधान समाजात तेढ निर्माण करणारे व प्रक्षोभक आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाणे तपास करीत आहेत.

You may have missed