Pune Crime News | महापालिकेचे अ‍ॅमेनिटी स्पेसची जागा लीजवर मिळवून देण्याच्या नावाखाली 24 लाखांची फसवणुक करणार्‍या माजी नगरसेविकेसह चौघांवर गुन्हा दाखल

Fraud

पुणे : Pune Crime News | महापालिकेचे अ‍ॅमेनिटी स्पेसची जागा लीजवर मिळवून देण्याच्या नावाखाली एका डॉक्टरची २४ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी माजी नगरसेविका, तिच्या पतीसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत डॉ. महेंद्र धोंडिराम सुरवसे (वय ३९, रा. नेको बेओमेंट न्याती इस्टेट, महंमदवाडी) यांनी काळे पडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी माजी नगरसेविका प्राची अशिष आल्हाट (Prachi Ashish Alhat), त्यांचे पती आशिष आल्हाट Ashish Alhat (दोघे रा. विठ्ठल स्मृती निवास, अल्हाट वस्ती), चिंतामणी कुरणे Chintamani Kurne (रा. महंमदवाडी) आणि आसिफ शेखरा (रा. मंगळवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार महंमदवाडी येथील व्हर्टिकल अलसेनिया तसेच आल्हाट यांच्या घरी नोव्हेबर २०२३ ते जुलै २०२५ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद डॉ. महेंद्र सुरवसे यांचा उंड्री हडपसर रोडवर ऑर्किड क्लिनिक या नावाने लहान मुलांचा दवाखाना आहे. त्यांच्या दवाखान्यात चिंतामणी कुरणे व त्यांची पत्नी हे दोघे त्यांच्या लहान मुलाला उपचारासाठी घेऊन येत होते. त्यावेळी त्यांनी आशिष आल्हाट हे माझे मित्र असून त्यांची पत्नी प्राची आल्हाट या नगरसेविका आहेत. महापालिका हद्दीमध्ये बांधकाम प्रकल्प करीत असताना बांधकाम व्यावसायिकांना काही जागा अ‍ॅमेनेटीस स्पेससाठी सोडणे बंधनकारक असते. त्यामुळे अनेक वैद्यकीय व्यावसायिकांना अ‍ॅमेनेटीस स्पेससाठी सोडलेली जागा महापालिकेने वैद्यकीय व्यवसायाकरीता हस्तांतरीत केलेली आहे. डॉक्टरांना हॉस्पिटलसाठी ३० वर्षाच्या लीजने दिलेल्या आहेत. तुम्ही राहत असलेल्या निको बीओमाऊंट सोसायटीच्या बिल्डरने प्रकल्पाच्या बाजूलाच अ‍ॅमेनेटीस स्पेस जागा सोडलेली आहे. तुम्हालाही अशी जागा मिळू शकते. त्यासाठी २५ ते २६ लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले. त्यानंतर ते व त्यांचे मित्र डॉ. रामेश्वर पठाडे हे प्राची आल्हाट यांच्या घरी गेले. त्यांनी तुम्हाला महंमदवाडी येथे हॉस्पिटलसाठी ३० वर्षाच्या लीजने जागा देतो, त्यासाठी तुम्हाला लीज अग्रीमेंट व इतर कामासाठी कमीत कमी २५ लाख रुपये लागतील, असे सांगितले. त्यानंतर चिंतामणी कुरणे, आशिष आल्हाट, प्राची आल्हाट यांनी त्यांना काही कागदपत्रे दाखविली. त्या कागदपत्रामध्ये त्यांनी एका हॉस्पिटलसाठी पुणे महापालिकेने अ‍ॅमेनेटीस स्पेसची जागा ३० वर्षाच्या लीजने दिल्याचा उल्लेख होता. त्यावर भरोसा ठेवून त्यांनी मागणी केल्याप्रमाणे वेळोवेळी त्यांना पैसे देत गेले. त्यानंतर टेंडर संदर्भात त्यांना दिलेल्या रक्कमेवर १८ टक्के जीएसटी भरावे लागेल, असे सांगून त्यांच्याकडून १५ लाख रुपये व जीएसटीचे २ लाख ७० हजार रुपये चिंतामणी कुरणे यांना दिले. काही दिवसांनी आशिष आल्हाट यांनी तुमचे काम शेवटच्या टप्प्यात आलेले आहे. त्यानंतर त्यांनी असिफ शेख यांची ओळख करुन देऊन त्यांच्याकडून महंमदवाडी येथील जागेचे डिझाईन तयार करुन घ्यायचे असल्याचे सांगितले. डॉ. पठाडे यांनी ५० हजार रुपयं त्याला दिले. आशिष आल्हाट व चिंतामणी कुरणे यांनी अग्रीमेंटचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरात लवकर १० लाख रुपये द्या, असे म्हणाले. त्यांनी महंमदवाडी येथील क्लिनिकमध्ये आशिष आल्हाट यांना ५ लाख रुपये दिले. वेगवेगळी कारणे सांगून त्यांनी लवकरच तुमचे काम होईल, असे सांगत राहिले. काम होत नसल्याचे दिसल्यावर त्यांनी आपली फसवणुक केल्याचे लक्षात आल्याने डॉ. महेंद्र सुरवसे यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक निंबाळकर तपास करीत आहेत.

You may have missed