Pune Crime News | बहिणीच्या मुलीला प्रेमविवाहात मदत केल्याच्या संशयावरुन पत्नी शिवीगाळ करुन सुरा काढून धमकी देणार्या पतीसह दोघांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | बहिणीच्या मुलीला प्रेमविवाहात मदत केल्याच्या संशयावरुन महिलेच्या पतीने व बहिणीच्या पतीने शिवीगाळ करुन सुरा दाखवून धमकाविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत चित्रा उमेश सत्रे (वय ४२, रा. उत्तमनगर, बालेवाडीगाव) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावर पोलिसांनी उमेश रामचंद्र सत्रे (वय ४३) आणि बहिणीचे पती हिमंत शंकरराव जमाले (वय ४९, रा. उत्तमनगर, बालेवाडी गाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार त्यांच्या राहते घरी १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चित्रा सत्रे व त्यांची बहिण चारुशिला हिमंत जमाले (वय ४१) हे शेजारी शेजारी राहतात. तिचे पती शंकरराव जमाले हे भोसरी येथे एका खासगी कंपनीत कामाला आहेत. उमेश सत्रे हे वाहनचालक म्हणून काम पहातात. दोघांनाही दारु पिण्याचे व्यसन आहे.
त्यांची मुलगी वैष्णवी जमाले (वय २१) हिने एक महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला आहे. प्रेमविवाहाला दोघांचा विरोध होता. तिला फिर्यादी व त्यांच्या बहिणीने मदत केल्याचा संशय होता. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी दोघेही दारु पिऊन घरी आले. त्यांनी फिर्यादी व तिच्या मुलाला, मुलीला शिवीगाळ करुन लागले व मारण्याची धमकी देऊ लागले. फिर्यादी यांनी त्यांना शिव्या देऊ नका, म्हणाल्यावर त्यांनी घरातील कोपर्यात ठेवलेल्या कापडी पिशवीतून लोखंडी धारदार सुरा काढून दाखवला. तुमच्याकडे बघून घेतो, अशी धमकी दिली. त्यावेळी फिर्यादी यांना भिती वाटल्याने त्यांनी १०० वर कॉल करुन माहिती दिली. फिर्यादी यांनी पोलीस कंट्रोलला फोन केल्याचे दोघांनी ऐकल्यावर ते निघून गेले. बाणेर पोलीस ठाण्याचे मार्शल घरी आले. त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्यास सांगितले. पोलीस हवालदार येडे तपास करीत आहेत.
