Pune Crime News | बांगला देशी महिलांना वेश्या व्यवसायाला लावणार्‍या पापा शेखसह  घरमालक, एजंटवर गुन्हा दाखल, कुंटणखाना चालिकेला अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | बांगला देशातून नोकरीचे आमिष दाखवून पुण्यात आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवुन घेणार्‍या एजंट पापा शेख, घरमालकासह बांगला देशी एजंटवर फरासखाना पोलिसांनी पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कुंटणखाना चालिकेला अटक करण्यात आली आहे.

निर्मला खिलारे (वय ३२, रा. सपना बिल्डिंग, बुधवार पेठ) असे अटक केलेल्या कुंटणखाना चालिकेचे नाव आहे. पुण्यातील एजंट बाबु भैय्या ऊर्फ पापा शेख (वय ३५, रा. बुधवार पेठ), घरमालक राजेश कलिमणी (वय ३५, रा. बालाजीनगर) आणि शरीफ (रा. बांगला देश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

बाबु भैय्या ऊर्फ पापा शेख हा नोकरीच्या आमिषाने बांगला देशातील महिलांना भारतात आणल्यानंतर त्यांना बुधवार पेठेत वेश्या व्यवसायाला लावण्यामध्ये एजंट म्हणून काम करतो. बुधवार पेठेत त्याचे वर्चस्व आहे. यापूर्वी त्यांच्यावर ४ गुन्हे दाखल आहेत. २०२४ मध्ये त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी तो सुमारे ३ महिने कारागृहात होता. त्यानंतर जामीन मिळाल्यानंतर तो अजूनपर्यंत बाहेर आहे.

खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, त्यांचे सहकारी व फरासखाना पोलिसांनी १८ फेब्रुवारी रोजी बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय चालणार्‍या सपना बिल्डिंगवर छापेमारी केली होती. त्यात ११ महिला बांगला देशी असल्याचे आढळून आले. त्यातील चार बांगला देशी महिलांकडे चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले की, बांगला देश येथील ढाका येथून एजंटने शिलाई काम, ब्युटी पार्लरमध्ये काम मिळवुन देतो, असे आश्वासन देऊन कोलकत्ता येथे आणले. तेथून एका एजंटने पुण्यामधील बुधवार पेठे येथे बाबु भैय्या ऊर्फ पापा शेख याच्याकडे वेश्या व्यवसाय करण्यासाठी ताब्यात दिले. त्यानंतर बाबु भैय्या याने त्यांची इच्छा नसताना त्यांना वेश्या व्यवसाय करण्यासाठी त्यांना सपना बिल्डिंग येथील निर्मला खिलारे हिचेकडे सोपविले होते.

तेव्हापासून निर्मला खिलारे हिने आमच्याकडून इच्छा नसताना, भिती घालून तसेच पैशांचे आमिष दाखवून, जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला. निर्मला खिलारे ने आमच्याकडे पाठविलेल्या ग्राहकांकडून मिळणार्‍या रक्कमेपैकी अर्धी रक्कम ती स्वत:कडे ठेवत़ त्यातील काही रक्कम घरमालक राजेश कलीमणी याला देत होती. आम्हाला आमच्या मुळ देशात परत जाण्याचा कोणताही मार्ग दिसत नसल्याने आम्ही नाईलाजाने तिच्या सांगण्याप्रमाणे वेश्या व्यवसाय करीत होतो, असे त्यांनी सांगितले. फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे तपास करीत आहेत.

You may have missed