Pune Crime News | महापालिकेच्या करआकरणी विभागात रिव्हॉल्व्हर दाखवून आत्महत्येची धमकी देणार्‍यावर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | जादा कर आकारणी केल्याचा आरोप करुन महापालिकेच्या कर आकारणी  विभागात रिव्हॉल्व्हर दाखवून आत्महत्येची धमकी देणार्‍या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेंद्र नरसिंह लोणकर Mahendra Narsingh Lonkar (रा़ कोंढवा खुर्द) असे रिव्हॉल्व्हर दाखविणार्‍याचे नाव आहे.

याबाबत महापालिकेच्या कर आकारणी विभागातील कर्मचारी गणेश दिलीप ठोंबरे (वय ३७, रा. कात्रज) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार महापालिकेच्या दुसर्‍या मजल्यावरील कर आकारणी विभागात शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मिळकत कराची थकबाकी असणार्‍यांसाठी महापालिकेची अभय योजना जाहीर केली होती. या योजनेची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत होती. (नंतर महापालिकेने त्याला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली) संबंधित योजनेअंतर्गत मिळकत कराबाबत चर्चा करण्यासाठी महेंद्र लोणकर हा शुक्रवारी महापालिकेच्या करआकारणी विभागात आला. त्याने कर्मचार्‍यांना थकबाकीबाबत विचारणा केली. 

कर्मचार्‍यांनी मिळकत कराच्या थकबाकीबाबत माहिती दिल्यानंतर संबंधित कर जादा असल्याचे सांगत, तो संतप्त झाला. त्याने आरडाओरडा करुन इमारतीवरुन उडी मारुन जीवाचे बरे बाईट करुन घेतो, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने माझेजवळ लायसन रिव्हॉल्व्हर आहे, असे म्हणून सगळ्यासमोर त्यांनी त्याच्या पॅन्टच्या खिशातून रिव्हॉल्व्हर बाहेर काढून स्वत:च्या डोक्याला लावत, मी आता आत्महत्या करणार असे म्हणू लागला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. महापालिकेच्या सुरक्षा विभागाचे कर्मचारी व इतरांनी त्याची समजूत काढली. त्यानंतर तो निघून गेला. रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक वळसे तपास करत आहेत.

You may have missed