Pune Crime News | अपंग व्यक्तीला मानसिक व शारीरीक त्रास देऊन धमकाविल्याने महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक, ठेकेदारावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | कार्यालयात आलेल्या अपंग व्यक्तीला मानसिक त्रास देऊन चांगली वागणूक दिली नाही, तसेच ते खाली पडले असतानाही त्यांना उठवले नाही, पत्नीला कामावरुन काढून टाकेन अशी धमकी देणार्या आरोग्य निरीक्षक व ठेकेदाराविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बापू गजेंद्र लोढे (वय ५६, रा. टिळेकरनगर, कात्रज) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन आरोग्य निरीक्षक राजु डुल्लन आणि ठेकेदार अशोक शेळके यांच्यावर अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम २०१६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १ सप्टेंबर २०२४ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापू लोंढे हे अपंग असून त्यांची पत्नी सुनिता ही गुजरवाडी ठेकेदार विभागात झाडुकाम करते. अशोक शेळके हे येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयामध्ये ठेकेदार म्हणून काम पाहतात. ते फिर्यादी यांच्या मुलीला कामावर घेणार होते. परंतु ते नेहमी उडवाउडवीचे उत्तरे देत होते. सप्टेबर २०२४ मध्ये बापू लोंढे हे येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालय येथे जाऊन ठेकेदार अशोक शेळके व आरोग्य निरीक्षक राजु डुल्लन यांना भेटले. मुलीला कामावर घेण्याची विनंती केली. तेव्हा ते बापू लोंढे यांना नेहमी म्हणायचे की, तुम्ही आयुक्त कार्यालयाकडून लेटर घेऊन या त्याशिवाय तुमच्या मुलीला कामावर घेता येणार नाही.
बापू हे अपंग असताना त्यांनी मानसिक व शारीरीक त्रास दिला व चांगली वागणुक दिली नाही. तसेच आरोग्य निरीक्षक राजू डुल्लन यांनीही मानसिक व शारीरीक त्रास दिला. अपंग असूनही चांगली वागणूक दिली नाही. डुल्लन म्ळणाले की, तुला कोठे जायचे आहे, तिकडे जा, माझे कोणच वाकडे करु शकत नाही. त्यामुळे बापू लोंढे हे आजारी पडून त्यांना बी पी, शुगरचा त्रास झाला. ते एकदा डुल्लन यांच्या कार्यालयात गेले असताना खाली पडले़ तरीही त्यांनी बापू लोंढे यांना उठवले नाही. डुल्लन व शेळके हे माझ्या कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात व माझ्या पत्नीला कामावरुन काढून टाकीन, अशी धमकी देतात, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी तपास करीत आहेत.
