Pune Crime News | फ्लॅट देण्याचे आश्वासन देऊन दुसर्‍याला परस्पर विक्री करुन फसवणूक करणार्‍या रवींद्र तागुंदे, कैलास भुंडे यांच्यावर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | बावधन येथील गृहसंकुलात फ्लॅट देण्याचे आश्वासन देऊन पैसे घेऊन परस्पर दुसर्‍याला फ्लॅटची विक्री करुन फसवणूक करणार्‍या दोघांवर वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत असिफ अहमद अन्सारी (वय ४४, रा. ओमकार कॉलनी, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रवींद्र सखाराम तागुंदे Ravindra Sakharam Tagunde (रा. आंबिका निवास, ओमकार कॉलनी, वारजे), कैलास दत्तात्रय भुंडे Kailash Dattatreya Bhunde (रा. गणपती मंदिराजवळ, बावधन) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार ८ नोव्हेंबर २०२० ते २३ मार्च २०२६ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र तागुंदे हे बिल्डर आणि प्लॉटिंग व्यावसायिक आहेत. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अभिजित येलवंदे याने रवींद्र तागुंदे याच्यावर जून २०२१ मध्ये डुक्कर खिंडीत गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

फिर्यादी असिफ अन्सारी यांचा जनता स्नॅक सेंटर आहे. त्यां सेंटरवर रवींद्र तागुंदे हे चहा पिण्यासाठी येत असत. त्यामुळे त्यांची ओळख झाली. ८ नोव्हेंबर २०२० रोजी तागुंदे स्नॅक्स सेंटरवर आले. त्यांनी मी आणि कैलास भुंडे आम्ही एकत्रितरित्या बावधन येथे कैलास भुंडे यांच्या मालकीच्या ९ गुंठे जमिनीमध्ये अन्वी असोसिएटस या बांधकाम फर्मच्या माध्यमातून अन्वी सरनिटी नावाने ५ मजली पीएमआरडीए मान्यता प्राप्त गृहसंकुल उभारत आहोत. त्यामध्ये दुसर्‍या मजल्यावर ९५० चौरस फुटाचा फ्लॅट विक्रीसाठी आहे. 

तुम्हाला घ्यायचा आहे का, अशी विचारणा केली. त्यांची त्याची किमंत ३४ लाख ५० हजार रुपये सांगितले. तसेच फ्लॅटचे अग्रीमेंटचा खर्च, लाईट मीटरचा खर्च तसेच वाहन पार्किंग करीता रिझर्व्ह  पार्किंग करीता वेगळी रक्कम द्यावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार १२ नोव्हेबर २०२० रोजी फिर्यादी यांनी कैलास भुंडे यांना १२ लाख रुपये दिले. व्यवहाराची विसार पावती केली. २४ डिसेंबर २०२० रोजी अडीच लाख रुपये दिले. फिर्यादी पाठपुरावा करत होते. पीएमआरडीएकडून बांधकामाची परवानगी अद्याप आली नाही, असे सांगून त्यांनी ताटकळत ठेवले. १ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांनी बांधकामाच्या ठिकाणी खड्डे घेतले असून पिलर टाकायचे आहेत, त्यासाठी पैशांची मागणी केली. 

त्याप्रमाणे त्यांनी वेळोवेळी पैसे दिले. २२ मार्च २०२३ पर्यंत ३२ लाख ३२ हजार ६७२ रुपये अन्वी सरनिटी च्या नावाने दिले. खरेदी खत करण्यासाठी फिर्यादी पाठपुरावा करु लागल्यावर त्यांनी टाळाटाळ सुरु केली. नवीन ठिकाणी अधिक रक्कमेची जागा देतो, असे सांगू लागले. जी जागा फिर्यादी यांना देणार होते, ती जागा त्यांनी परस्पर दुसर्‍याला विकली. हे समजल्यावर फिर्यादी यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी २० लाख रुपये परत दिले. उर्वरित १२ लाख ३२ हजार ६७२ रुपयांची मागणी करुनही त्यांनी ती परत न करता फसवणूक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रायगौंडा तपास करीत आहेत.

You may have missed