Pune Crime News | मृतदेहांची आदलाबदल केल्याने गोंधळ झाल्याप्रकरणी रुबी हॉल क्लिनिकमधील शवगारातील कर्मचार्यांवर गुन्हा दाखल; हॉस्पिटलमधील कर्मचार्यांनी संगनमत करुन माहिती दडवली
पुणे : Pune Crime News | खात्री न करता मृतदेहाची आदलाबदली करुन महिलेचा मृतदेह दुसर्यांकडे सोपविला. त्यामुळे महिलेच्या नातेवाईकांना त्रास होऊन त्यांनी आंदोलन केले. याप्रकरणी पोलिसांनी रुबी हॉल क्लिनिकमधील शवगृहातील कर्मचारी व मृतदेह हाताळणी करणार्यांवर कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, त्यावेळी रुबी हॉल क्लनिकमधील कर्मचार्यांनी संगनमताने माहिती दडविली आहे. तसेच रुबी हॉल क्लनिकने आपल्या कर्मचार्यांच्या चुकीवर पांघरुण घालण्यासाठी चुकीचा खुलासा करुन सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
याबाबत यश कल्याणराव भगत (वय २७, रा. माळेगाव, ता. बारामती) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार रुबी हॉल क्लिनिक येथे १९ जानेवारी रोजी रात्री ११ ते २० जानेवारी पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या नातेवाईक सुनिता पांडुरंग भगत यांचा उपचारादरम्यान रुबी हॉल क्लिनिकमध्ये मृत्यु झाला होता. रात्रीची वेळ असल्याने त्यांनी मृतदेह शवागृहात ठेवण्यात आला होता. दरम्यान, शवगारातील कर्मचार्यांनी महिलेच्या नावातील साम्यामुळे हा मृतदेह दुसर्या महिलेच्या नातेवाईकांना सुपुर्द केला. ते रुग्णवाहिकेतून तो मृतदेह घेऊन गावाकडे निघाले होते. दरम्यान, भगत व त्यांचे नातेवाईक हे मृतदेह घेण्यासाठी गेले असता शवागारात मृतदेह आढळून आला नाही. शवागारातून महिलेचा मृतदेह गायब झाल्याने एकच खळबळ उडाली होती. हे समजल्यावर नातेवाईकांनी रुग्णालयाच्या आवारात आंदोलन सुरु केले.
हे समजल्यावर पोलीस रुग्णालयात पोहचले. त्यांनी माहिती घेतली. तेव्हा शवागारातील कर्मचार्यांनी खात्री न करता महिलेचा मृतदेह दुसर्यांना दिला होता. ज्यांच्याकडे हा मृतदेह देण्यात आला होता. ते गावाकडे अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन चालले होते. त्यांच्याशी संपर्क साधून परत बोलावण्यात आले. मृतदेह रुग्णवाहिकेतून कसा आला. तेथील शवागारातून तो दुसरीकडे कसा गेला, असा प्रश्न भगत यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला होता. त्यावेळी रुबी हॉल क्लिनिककडून ससून रोड येथील शवागार दुरुस्तीखाली असल्याने मृतदेह रुबी हॉल वानवडी येथे हलविण्यात आला होता, अशी सारवासारव करणारा खुलासा केला होता. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता.
यश भगत यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी केली. त्यात रुबी हॉल क्लिनिकमधील शवागृहातील प्रभारी व मृतदेह हाताळणी करणार्यांनी एमएलसी नीट तपासले नाही. नावातील साधान्यामुळे दुसर्यांच्या ताब्यात मृतदेह दिला. यामुळे मृतदेहाची अप्रतिष्ठ झाली. तसेच हॉस्पिटलमधील कर्मचारी यांनी संगनमताने माहिती दडवली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे तपास करीत आहेत.
