Pune Crime News | औषधोपचारात हलगर्जीपणा केल्याने रुग्णाचा मृत्यु झाल्याप्रकरणी दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | श्वास घेताना त्रास होत असल्याने कोरेगाव पार्क येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णावर उपचार करताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. नीलेश कोंद्रे व त्यावेळी ड्युटीवर उपस्थित असलेले डॉक्टर (बुधरानी हॉस्पिटल) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
प्रवीण म्हस्के (वय ३५, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) असे मृत्यु पावलेल्या रुग्णाचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी उर्मिला प्रवीण म्हस्के (वय ३०) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना बुधरानी हॉस्पिटलमध्ये २० ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी साडेबारा ते पावणे चार वाजेच्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण म्हस्के यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने बुधरानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना प्रवीण म्हस्के यांचा मृत्यु झाला होता. याबाबत उर्मिला म्हस्के यांनी तक्रार केल्यावर कोरेगाव पार्क पोलिसांनी उपचारासंबंधित सर्व कागदपत्रे ताब्यात घेऊन ससून रुग्णालयाकडे पाठविली होती. ससून रुग्णालयातील वैद्यकीय समितीने या उपचाराची सर्व माहिती घेऊन चौकशी केली. उपचारामध्ये हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्यामुळे म्हस्के यांचा मृत्यु झाल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला. त्यावरुन कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार तपास करीत आहेत.
