Pune Crime News। पीएमपीचे बनावट मोबाईल अ‍ॅप्लीकेशन तयार करुन खोटा दैनंदिन पास तयार करुन फसवणुक करणार्‍या तरुणावर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News । पीएमपीच्या मुळ अ‍ॅप्लीकेशन सारखेच दिसणारे बनावट मोबाईल अ‍ॅप्लीकेशन तयार करुन त्यावर खोटा दैनंदिन पास तयार करुन त्यावरुन प्रवास करुन पीएमपीची फसवणूक करणार्‍या एका तरुणावर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कौस्तुभ शैलेश मांजरेकर Kaustubh Shailesh Manjrekar (वय २४, रा. प्रितम हाईटस, बालाजीनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीएमपीएमएलतर्फे मिठ्ठु साहेबराव बडे (वय ४५, रा. शेवाळेवाडी फाटा, मांजरी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना भारती विद्यापीठ बी आर टी बस स्टॉपवर २६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कौस्तुभ मांजरेकर हा नोकरी करतो. तो भारती विद्यापीठ बी आर टी बस स्टॉप येथून पीएमपी बसमधून प्रवास करत होता. त्यावेळी त्याने मिठ्ठु बडे यांना आपल्या मोबाईलवरील दैनंदिन पास दाखविला. तो पास पाहून त्यांना शंका आली. त्यांनी त्याची खात्री करण्यासाठी पीएमपी कार्यालयाशी संपर्क साधून त्याची खात्री करुन घेतली. त्यात तो पास बनावट असल्याचे आढळून आले.

कौस्तुभ मांजरेकर याने स्वत:च्या व इतरांच्या आर्थिक फायद्याकरीता पीएमपीच्या मुळ अ‍ॅप्लीकेशन सारखेच दिसणारे बनावट मोबाईल अ‍ॅप्लीकेशन तयार केले. त्यात ७० रुपयांचा खोटा दैनंदिन पास तयार करुन त्याचा वापर करुन तो अधिकृत पासधारक असल्याचे भासविले. या पास द्वारे तो पुणे शहरामध्ये प्रवास करुन पी एम पीची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणुक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे तपास करीत आहेत. 

You may have missed