Pune Crime News | वाय आर के व्हेंचर्स कंपनीच्या मालकासह प्रोजेक्ट मॅनेजर, इंजिनिअरवर गुन्हा दाखल, कामगाराच्या डोक्यात लोखंडी पाईप, जाळी पडून मृत्यु
पुणे : Pune Crime News | बाणेर येथील पल्लोड फार्म्स परिसरात सुरु असलेल्या वायआर के व्हेंटर्स या कंपनीच्या यु व्ही होम्स कन्ट्रक्शन या इमारतीच्या बांधकामावर कामगाराच्या डोक्यात लोखंडी पाईप, जाळी पडून कामगाराचा मृत्यु झाला. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी वायआरके व्हेंचर्स कंपनीचे मालक, यु व्ही होम्स कन्ट्रक्शन साईटचे प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे शुभम राजेश अवस्थी Shubham Rajesh Awasthi (वय २८), इंजिनिअर्स विशाल व्यंकटराव काटे Vishal Venkatrao Kate (वय ४९) व इतरांवर सदोष मनष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
करीम चमत्कार शेख (वय ३५) असे मृत्यु पावलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत रबिऊल राहीद शेख (वय ३२, रा. लेबर कॅम्प, पाटीलनगर, बावधन) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार बाणेरमधील पल्लोड फार्मस येथील वायआरके व्हेंचर्स या कंपनीच्या यु व्ही होम्स कन्ट्रक्शन साईटवर २८ मार्च रोजी दुपारी दीड वाजता घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करीम शेख हा फिर्यादी यांच्या बहिणीचा पती आहे. यु व्ही होम्स कन्ट्रक्शन साइटवर पाईप लाईन काँक्रीटचे काम करीम शेख करत होता. त्यावेळी सेफ्टी लोखंडी जाळीचे पाईप काढण्याचे काम चालू होते. त्यातील लोखंडी पाईप व जाळी करीम यांच्या डोक्यात पडली. त्यात करीम गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला. कामगारांची व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात येईल, असे हयगयीचे व निष्काळजीपणाचे कृत्य करुन करीम शेख यांच्या मृत्युस कारणीभूत झाल्याबद्दल बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करीत आहेत.
