Pune Crime News | काँग्रेस भवनासमोरील आंदोलनात दगडफेक करुन जखमी केल्याबद्दल भाजप, काँग्रेस शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, पाच जणांसह पोलीस, पत्रकार जखमी
पुणे : Pune Crime News | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात भाजपच्या वतीने काँग्रेस भवनासमोर रविवारी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळी झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांकडून भाजप आणि काँग्रेसच्या शहराध्यक्षांसह १०० ते १५० कार्यंकर्त्यांवर रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आंदोलना दरम्यान, काँग्रेस व भाजपचे ५ कार्यकर्ते, पोलीस व पत्रकारही जखमी झाले.
यावेळी दगड लागल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते प्रियंका ठाकूर (रा. पुणे स्टेशन), केदार सातपुुते (रा. कोथरुड) विकास कांबळे (रा. बोपोडी) हे जखमी झाले आहेत. प्रियंका ठाकूर यांच्या चेहर्यावर दगड लागला. केदार सातपुते यांच्या डोक्यात दगड लागून जखम झाले तर विकास कांबळे यांच्या पायाला दगड लागला. भाजपचे कार्यकर्ते स्वप्नील दिलीप गाडे आणि महेश बाबासहेब गिते हे दगड लागल्याने जखमी झाले आहेत.
काँग्रेसच्या वतीने प्राची नितीन दुधाणे (वय ४२, रा. दुधाणेनगर, कर्वेनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, युवा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ व इतर ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, युवा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ व इतर पदाधिकारी यांनी काँग्रेस भवन येथे ५० ते ६० लोकांच्या जमावाने येऊन चिथावणीखोर घोषणाबाजी करुन दगडफेक करुन काँग्रेसच्या ३ कार्यकर्त्यांना जखमी केले. तसेच गाड्यांची तोडफोड केली.
देशभर महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत असताना व त्यात पोलीस बंदोबस्तात असताना त्यांनी भाजपला आंदोलनासाठी परवानगी कशी दिली. आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस भवनसमोर येऊन दिले, त्यांना स्पीकर लावण्याची व घोषणा परवानगी कशी दिली, असा प्रश्न विचारुन फिर्यादी प्राची दुधाणे म्हणाल्या की, या घटनेनंतर काँग्रेसचे सर्व कार्यकत्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतल्याचे दुधाणे यांनी सांगितले.
याविरोधात नगरसेवक पुनीत श्रीकांत जोशी (वय ३५, रा. मनिषकुंज, आयडीयल कॉलनी, कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, कसबा मतदार संघ उपाध्यक्ष गौरव विजय बाळंदे, अक्षय जैन, सागर धाडवे व इतर काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
भाजपतर्फे काँग्रेस भवन येथे निषेध आंदोलन करण्याकरीता एकत्र जमले होते. आंदोलन संपल्यानंतर सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी जात असताना सागर धाडवे आणि गौरव बाळंदे व त्यांच्या सोबत शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अक्षय जैन व इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी फिर्यादी व त्यांचे कार्यकर्त्यांवर दगडफेक केली. त्यात भाजपचे कार्यकर्ते स्वप्नील दिली गाडे, महेशा बाबासाहेब गिते यांना दगड लागून दुखापत झाली. तसेच आंदोलनाच्या बंदोबस्ताकरीता असलेल्या महिला पोलीस, पत्रकार हे देखील दगड लागून जखमी झाले. सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे तपास करीत आहेत.
