Pune Crime News | तब्बल 100 तासांचे 500 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणातून चैनस्नॅचिंग करणारे गुन्हेगार नाशिकहून जेरबंद
पिपंरी/ पुणे : Pune Crime News | चिखलीतील जाधववाडी आणि संत तुकारामनगर येथील महिलांच्या गळ्यातील चैन स्नॅचिंग करणार्या गुन्ह्यांचा तपास करताना गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेर्यांचे १०० हून अधिक तासांच्या फुटेजचे विश्लेषण करुन नाशिकवरुन दोघा सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे.
अक्षय सुनिल बोरकर (वय २१, रा. श्रमिकनगर, सातपूर, नाशिक) आणि प्रशांत संतविजय यादव (वय १९, रा. शिवाजीनगर, गंगापूर, नाशिक) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. नाशिक ग्रामीण हद्दीतील विविध पोलीस ठाण्यात त्यांच्यावर २५ हून अधिक चैन चोरी व मालाविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या चैन स्नॅचिंगच्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांनी चैन स्नॅचिंगच्या जबरी चोर्यांच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पथक तैनात केले.
या पथकातील पोलीस हवालदार महादेव जावळे यांनी त्यांच्या सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याच्या कौशल्याचा पुरेपुर वापर करुन पथकातील इतर अधिकारी व अंमलदार यांचे सहकार्य घेऊन गुन्ह्याचे घटनास्थळापासून ते हे गुन्हा करणारे मोटारसायकलवरील गुन्हेगारांचा पिंपरी चिंचवड, पुणे शहर व पुणे ग्रामीण हद्दीतील त्यांच्या प्रवासाचा मागोवा बारकाईने घेऊन माग काढला. त्यासाठी त्यांनी ५०० पेक्षा अधिक सीसीटीव्हीचे १०० हून अधिक तासाच्या फुटेजची पडताळणी केली. आरोपी हे मुख्य रस्ता न वापरता वारंवार रस्ते बदलून आड मार्गाने जात होते.
सचोटीने व सातत्याने फुटेजची पाहणी करुन व मिळालेल्या फुटेजचे विश्लेषण करुन त्यांची पडताळणी करुन आरोपींची नावे निष्पन्न केली. त्यांच्या मोबाईलचे लोकेशनद्वारे पत्ता काढून गंगापूर, नाशिक ग्रामीण येथे पथकासह जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी चिखली व संत तुकारामनगर येथीले दोन चैन स्नॅचिंगचे गुन्हे केलेल्याची कबुली दिली. चिखली येथील ४६ वर्षाच्या महिलेच्या गळ्यातील १ लाख रुपयांचे गंठण ८ जानेवारी रोजी त्यांनी हिसकावुन नेले होते. तसेच संत तुकारामनगर येथील एका महिलेचे २ लाख ४० हजार रुपयांचे मंगळसुत्र हिसकावुन नेले होते. पोलिसांनी या दोन्ही गुन्ह्यातील ३ लाख ४० हजार रुपयांचे १०० टक्के सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त ड. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहायक पोलीस आयुक्त दत्तात्रय गुळींग, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वेताळ, संतोष इंगळे, पोलीस हवालदार महादेव जावळे, जयवंत राऊत, देवा राऊत, शिवराम भोपे, अजय डगळे, शेळकंदे, पोलीस अंमलदार संदेश देशमुख, लक्ष्मीकांत पतंगे, विजय जानराव, तेजस भालचिम, चिखलकर, खेडकर यांनी केली आहे.
