Pune Crime News | 43 लाखांच्या वसुलीसाठी चार्टर्ड अकाऊटंटने टिपू पठाणच्या साथीदाराला दिली सुपारी; चाटर्ड अकाऊंटंटसह टिपु पठाणच्या साथीदाराला अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  हात उसने घेतलेले पैसे परत केले असतानाही त्यावर पठाणी व्याज लावून ४३ लाख रुपयांची मागणी  चार्टर्ड  अकाऊंटंटने केली़ पैसे देण्यास नकार दिल्यावर या चार्टर्ड अकाऊंटंटने टिपू पठाणच्या साथीदाराला सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हडपसर पोलिसांनी  चार्टर्ड  अकाऊंटंटसह टिपु पठाणच्या साथीदाराला अटक केली आहे.

अनिल संभाजी यादव Anil Sambhaji Yadhav (वय ४२, रा़ कर्वेनगर) आणि नदीम खान (वय ४२, रा़ सय्यदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत हडपसर येथील एका ५० वर्षाच्या व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०२३ पासून आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या अ‍ॅम्ब्युलन्स भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या व्यवसायाचे वार्षिक जमा खर्चाच्या हिशोबासाठी त्यांनी  चार्टर्ड अकाऊंटंट अनिल यादव यांची नेमणूक केली होती. यादव यांना ते मागील २० ते २५ वर्षांपासून ओळखतात. २०१८ मध्ये त्यांना पैशांची अडचण असल्याने त्यांनी अनिल यादव यांच्याकडून १२ लाख रुपये हात उसने घेतले होते. तेव्हा यादव हा घेतलेल्या पैशांच्या व्याजाबाबत काही बोलला नव्हता. २०१९ ते २०२२ पर्यंत त्यांनी एकूण २३ लाख ८८ हजार रुपये घेतले. त्यांना वेळोवेळी पैसे परत करत गेले. त्यांनी एकूण २४ लाख रुपये परत केले. २०२३ मध्ये अनिल यादव यांना पैसे देणे बंद केले. तेव्हा अनिल यादव याने मी तुला दिलेले पैसे बँकेतून कर्ज काढून दिले होते. तू फक्त व्याजच देत होता. अजून ४३ लाख रुपये बाकी आहे. त्यावर फिर्यादी यांनी तू दिलेल्या पैशांपेक्षा अधिक पैसे परत केले आहे. आता पैसे देणार नाही, असे सांगितले.

जुलै २०२३ मध्ये त्यांना एका फोन आला.  त्यांना नदीम खान बोलत असल्याचे सांगितले. नदीम खान याने त्यांना सांगितले की, अनिल यादव याने मला तुमचेकडून पैसे वसुली करण्याची सुपारी दिली आहे. तुला पैसे द्यावेच लागतील. पैसे कसे देत नाहीत तेच पाहतो, तुझ्या गाड्या रोडवर कशा चालतात ते बघतो, अशी धमकी दिली. मी टिपू पठाण गँगसाठी काम करतो़ मी आठ दिवस बाहेर आणि बाकी दिवस जेलमध्ये असतो, तुला माझा इतिहास माहती आहे का, बिनावत याच्यावर हडपसर येथे मी गोळीबार केला आहे, असे सांगून त्यांना धमकावले.

त्यांनी टिपू पठाण याची माहिती घेतल्यावर त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी ऐकून ते घाबरुन गेले़ त्यांनी १ ऑगस्ट २०२३ पासून नदिम खान यांना पैसे देण्यास सुरुवात केली. २३ मार्च २०२५ पर्यंत नदिम खान याला ३ लाख १५ हजार रुपये दिली आहेत. एक महिन्यांपूर्वी नदीम खान याने कॅम्पमधील हॉटेल डायमंड बोलावुन उर्वरीत ४० लाख रुपये कधी देणार, जर पैसे दिले नाही तर तुला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलिसांकडे तक्रार केली होती.. पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी तपास करीत आहे.