Pune Crime News | पुजा खेडकर यांच्या बंगल्यावरील दरोड्याप्रकरणात चतु:श्रृंगी पोलिसांनी एकाला मुंब्रावरुन केली अटक
पुणे : Pune Crime News | बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बाणेर रोडवरील बंगल्यात तिच्या आईवडिलांसह ५ जणांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करुन दरोडा टाकण्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांना एका मोठे यश मिळाले असून चतु:श्रृंगी पोलिसांनी एकाला मुंब्रा येथून अटक केली आहे.
खुम्मा दिलबहादुर शाही Khumma Dil Bahadur Shahi (वय ४०, रा. कौशल, मुंब्रा, जि़ ठाणे) असे त्याचे नाव आहे. मुम्मा शाही हा खेडकर यांच्याकडे नुकताच कामाला ठेवलेल्या हिकमत याचे वडिल आहेत.
पूजा खेडकर यांच्या नॅशनल हौसिंग सोसायटीतील बंगल्यामध्ये १० ते १५ दिवसांपूर्वी हिकमत हा कामाला लागला होता. शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्याने पूजाचे आई वडिल व रखवालदार, कुक आणि वाहनचालक यांना गुंगीतून औषध देऊन त्यांना बेशुद्ध केले होते. त्याचवेळी पूजा खेडकर या बाहेरुन घरी आल्या. त्यांना पाहून चोरट्याने त्यांचे चिकटपट्टीने हातपाय बांधून ठेवले. त्यानंतर घरातील चीजवस्तू घेऊन ते पळून गेले होते.
घरातील सर्वच प्रमुख हे बेशुद्ध असल्याने नेमका हा प्रकार कसा झाला, याची माहिती अद्याप समजू शकली नाही. पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे व त्यांच्या सहकारी यांनी हिकमत या नेपाळी नोकराचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याचे वडिल खुम्मा शाही हे मुंब्रा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा मुंब्रा येथून अटक केली. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयातून पोलीस कोठडी घेतल्यानंतर त्यांच्याकडे अधिक तपास करण्यात येईल.
बंगल्यातील सीसीटीव्हीमध्ये एकूण ७ आरोपी निष्पन्न झाले आहे. खुम्मा शाही याच्याकडे चौकशी केल्यानंतर याबाबतची अधिक तपशील मिळू शकेल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी सांगितले.
