Pune Crime News | ठेकेदाराला पकडून चतु:श्रृंगी पोलिसांनी गावठी पिस्टल 2 जिवंत काडतुसे केली जप्त; संरक्षणासाठी बाळगले होते पिस्टल
पुणे : Pune Crime News | ठेकेदारीचा व्यवसाय करणार्यास चतु:श्रृंगी पोलिसांनी पकडून त्याच्याकडून गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
रोहित ढाक्या मेघावत Rohit Dhakya Meghawat (वय २४, रा. संजय गांधी वसाहत, लमाण तांडत्त, गणपती मंदिराशेजारी, पाषाण) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलीस अंमलदार इरफान मोमीन यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पाषाण येथील मनपा कोठी चौक येथे २६ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे तपास पथक हे गस्त घालत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, पाषाण येथील मनपा कोठी चौक येथे एक जण थांबला असून त्याच्याकडे शस्त्र आहे. या माहितीची खात्री करुन पोलिसांनी तेथे जाऊन रोहित मेघावत याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २० हजार रुपयांचे गावठी बनावटीचे पिस्टल व २ हजार रुपयांच्या २ जिवंत काडतुसे असा माल मिळाला. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे.
रोहित मेघावत हा ठेकेदारी व्यवसाय करतो. त्यातून आपल्यावर कोणी हल्ला केला तर, या विचाराने त्याने संरक्षणासाठी पिस्टल बाळगल्याचे सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे अधिक तपास करीत आहेत.
