Pune Crime News | बांधकाम ठेकेदाराची एक कोटीची फसवणूक ! इन्कोफिना कन्सल्टंट कंपनीचे संचालक झाले फरार, कोथरुड, चतु:श्रृंगी, डेक्कन पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल
पुणे : Pune Crime News | शेअर बाजारात गुंतवणूक करुन दरमहा अडीच ते चार टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून इन्कोफिना कन्सल्टंट एल एल पीमध्ये (Incofina Consultants LLP) पैसे गुंतवण्यास सांगून बांधकाम ठेकेदाराला १ कोटी ५० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Cheating Fraud Case)
कोथरुड पोलिसांनी इन्कोफिना कन्सल्टंट एल एल पीचे संचालक अमर बिरादार, ज्ञानेश्वरी अमर बिरादार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दाम्पत्यांवर चतु:श्रृंगी, डेक्कन पोलीस ठाण्यात यापूर्वीच अनेकांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दाम्पत्य गेल्या वर्षभरापासून बाणेर येथील कार्यालय बंद करुन पसार झाले आहे.
याबाबत एका ५० वर्षाच्या बांधकाम ठेकेदाराने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिरादार दाम्पत्याशी बांधकाम ठेकेदाराची २०१९ मध्ये ओैंध भागातील एका कार्यक्रमात ओळख झाली होती. त्यानंतर आरोपींशी त्यांच्या परिचय वाढला. शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात इन्कोेफिना कन्स्टलिंग कंपनी सुरू केली असल्याची बतावणी बिरादार दाम्पत्याने ठेकेदाराकडे केली. कंपनीत दहा लाख रुपये गुंतविले तर दरमहा अडीच ते चार टक्के परतावा मिळे, तसेच मूळ रक्कम अडीच वर्षात परत मिळेल, असे आमिष बिरादार दाम्पत्याने त्यांना दाखविले. त्यानंतर ठेकेदाराने बिरादार दाम्पत्याकडे गुंतवणूक करण्यास काही रक्कम दिली. त्यांनी ठेकेदाराला परतावा दिला. परतावा मिळाल्याने त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर ठेकेदाराचा भाचा, पती यांनी बिरादार दाम्पत्याकडे गुंतवणूक करण्यास रक्कम दिली. त्या वेळी आरोपींनी दरमहा सहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर ठेकेदारांनी वडील आणि आईच्या नावे आणखी रक्कम गुंतविली. त्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे परताव्याची रक्कम दिली नाही. रक्कम कमी प्रमाणात मिळाल्याने ठेकेदाराला संशय आला. त्यांनी बिरादार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बिरादार दाम्पत्याने कार्यालय बंद करुन पळून गेल्याचे लक्षात आले़ पुण्यात फक्त त्याचे वडिल आणि भाऊ रहात आहेत़ ज्ञानेश्वरी व अमर बिरादार यांच्याविषयी ते काहीही माहिती देत नसल्याचे फिर्यादी यांनी सांगितले़
या दाम्पत्याने आणखी एका गुंतवणुकदाराची ८६ लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा गेल्या महिन्यात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
