Pune Crime News | चुलत भावानेच कर्जाची परतफेड करण्यासाठी भावाच्या घरात शिरुन 22 लाखांचे दागिने, रोकड नेली होती चोरुन; मुंढवा पोलिसांनी 24 तासात आणला गुन्हा उघडकीस
पुणे : Pune Crime News | घरातील ३७९ ग्रॅमचे दागिने, १ किलो चांदी, रोकड असा २२ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. पण, चोरट्यांनी ना कडी कोयंडा उचकटला होता, ना घरात शिरुन ऐवज शोधाशोध करण्यासाठी उचकपाचक केली होती. पोटमाळ्यावर ठेवलेले दागिने आणि रोकड नेमकी चोरुन नेली होती. हा सर्व परिस्थितीजन्य पुरावा लक्षात घेऊन मुंढवा पोलिसांनी तपास केला. त्यात चुलत भावानेच चोरी करुन दागिने व रोकड चोरल्याचे निष्पन्न झाले.
आशुतोष अशोक कासवा Ashutosh Ashok Kasva (वय ३८, रा. गजानन महाराज हौसिंग सोसयटी, राजर्षी शाहु महाराज प्राथमिक विद्यालयाचे शेजारी, मुंढवा) असे मुंढवा पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
याबाबत श्रेणिक विनोद कासवा (वय ४०, रा. गजानन महाराज सोसायटी, मुंढवा) यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. कासवा यांचा व्यवसाय आहे. त्यांच्या घरात ५ व ६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान चोरट्याने घरफोडी करुन ३७९ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक किलो चांदी तसेच रोख २ लाख असा एकूण २२ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता.
मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मीता वासनिक यांनी स्वत: घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. एकंदर परिस्थिती पाहता घरातील ऐवज चोरीला गेला असला तरी घरातील सर्व इतर चीजवस्तू जागेवरच होत्या. चोरट्याने कशालाही हात लावला नव्हता. चावीने कुलूप काढून घरात प्रवेश केलेला दिसत होता. तेव्हा हे काम कोणत्या तरी परिचितांचे असल्याचे लक्षात आले. ते घराची चावी ठेवतात, अशा २ ते ३ जणांवर संशय होता.
घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती याचा वापर करुन केलेल्या विश्लेषणात त्यांचा सख्खा चुलत भाऊ आशुतोष कासवा यांच्यावर संशय बळावला. तोही व्यापारी आहे. परंतु, त्याला कर्ज झाले असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. कर्जाची परतफेड करण्यासाठी आपणच घरात शिरुन चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीला गेलेले एकूण ३७९ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, एक किलो चांदी व २ लाख रुपये रोख असा एकूण २२ लाख ११ हजार रुपयांचा माल आशुतोष कासवा याच्या घरातून जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण, सहायक पोलीस फौजदार राजु कदम, पोलीस हवालदार शिवाजी जाधव, योगेश गायकवाड, राहुल मोरे, राहुल धोत्रे, शिवाजी धांडे, पोलीस अंमलदार अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर, योगेश राऊत यांनी केली आहे.
