Pune Crime News | 60 हजार रुपयांचा रोबोट खरेदी कॅन्सल करण्यासाठी सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडून लाटले 3 लाख रुपये; पोलिसांनी तब्बल वर्षाने दखल घेऊन केला गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | घरातील झाडलोट करणारे एका कॉम्पेक्ट डिश सारखा दिसणारा ecovacs robot रोबोट हा घरातील सामानाच्या खाली जाऊनही साफसफाई करीत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर दिसून येतात. साधारण ३० हजारापासून ६४ हजार रुपयांपर्यंत ऑनलाईन हे रोबोट मिळतात. एका ज्येष्ठ नागरिकाने अॅमेझॉनवरुन त्यासाठी ऑर्डर केली होती. ती वेळेत न आल्याने त्यांनी ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी गुगलवर अॅमेझॉन कंपनी ग्राहक सेवा क्रमांक शोधून मोबाईलवर फोन केला. त्याबरोबर ते सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकले. सायबर चोरट्यांनी त्यांना २ लाख ९७ हजार ८१२ रुपयांना गंडा घातला.
याबाबत प्रभात रोडवरील एका ६४ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १९ मार्च २०२५ रोजी घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी १५ मार्च २०२५ रोजी अॅमेझॉन अकाऊंटद्वारे ecovacs robot खरेदी केला होता. दिलेल्या तारखेपर्यंत प्राप्त न झाल्याने त्यांनी १९ मार्च २०२५ रोजी गुगलद्वारे अॅमेझॉन कंपनी ग्राहक सेवा क्रमांक शोधला. त्यावर मिळालेल्या मोबाईलवर त्यांनी संपर्क केला. अॅमेझॉनद्वारे खरेदी केलेली वस्तू मिळालेली नाही. ही ऑर्डर मला कॅन्सल करायची असल्याबाबत कळविले. त्यानंतर त्यांना दुसर्या मोबाईल नंबरवरुन कॉल आला़ ऑर्डर कॅन्सल करण्याकरीता काही रक्कम पे करावी लागेल, असे सांगितले. त्यावर त्यांचा विश्वास बसल्याने व ऑर्डर कॅन्सल करण्याकरीता त्यांनी आपल्या बँक खात्यातून ५० हजार रुपये, ५० हजार रुपये, ९८ हजार ९०६, ९८ हजार ९०६ असे एकूण २ लाख ९७ हजार ८१२ रुपये पाठविल्यानंतर आपली सायबर आर्थिक फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी २६ मार्च २०२५ रोजी तक्रार अर्ज दिला होता. ऑनलाईन सायबर पोर्टलवर तक्रार केली होती. त्याची पोलिसांनी आता वर्षभराने दखल घेऊन गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर तपास करीत आहेत.
