Pune Crime News | दुकान चालविता चालविता करत होते अंमली पदार्थांची तस्करी; अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना पकडून साडेबारा लाखांचा मेफेड्रॉन केला जप्त

Pune Crime News | Drug smuggling was going on while running a shop; Anti-narcotics squad arrests two and seizes mephedrone worth Rs 12.5 lakh

पुणे : Pune Crime News | खराडी ईऑन आयटी पार्क जवळ संशयास्पद थांबलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्यांच्याकडून १२ लाख ४१ हजार रुपयांचा २७ ग्रॅम मेफेड्रॉन (एम डी) जप्त केला आहे.

मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (वय २८, रा. धोका बिल्डिंग, लोहगाव रोड, वाघोली, मुळ रा. जोधपूर, राजस्थान) आणि हरीश सुजनाराम देवासी (वय २२, रा. बाईफ रोड, वाघोली, मुळ रा. बाडमेर, राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राजपुरोहित हा गेली १० वर्षापासून पुण्यात असून त्याचे गिफ्ट शॉप आहे. देवासी हा गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात असून त्याचे मोबाईल शॉप असून त्याच्या आड ते अंमली पदार्थांची तस्करी करीत असल्याचे आढळून आले.

अंमली पदार्थ विरोधी पथक हे पुणे शहरात विविध भागात पेट्रोलिंग करत पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास खराडी येथील ईऑन आय टी पार्क फेज २ मागील गेटजवळ आले. तेथे दोघे जण संशयास्पदरित्या थांबलेले दिसून आले. इतक्या पहाटे ते काय करत आहेत, या संशयावरुन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली. त्यांच्याकडे २७ ग्रॅम मेफेड्रॉन  (एम डी) आढळून आला. दोघांविरुद्ध खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड, पोलीस अंमलदार संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, सुनिल महाडिक, गणेश गोसावी, संदिप देवकाते, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड, शुभांगी म्हाळसेकर, खराडी पोलीस ठाण्याकडील कॉप्स २४ चे मार्शल पोलीस अंमलदार पगारे, जाधव यांनी केली आहे.

You may have missed