Pune Crime News | अपघातात जखमीला रुग्णालयात नेतो सांगून रस्त्यात टाकून दिल्याने वृद्धाचा मृत्यु; रिक्षाचालकाला साडेचार महिन्यांनंतर बाणेर पोलिसांनी दिल्लीतून केली अटक

Arrest (4)

पुणे : Pune Crime News | बाणेर भागात रिक्षाच्या धडकेमुळे गंभीर जखमी झालेल्या वृद्धाला उपचारासाठी रुग्णालयात नेतो, असे सांगून रिक्षातून घेऊन जाऊन जखमी अवस्थेत खडकीतील लोहमार्गाजवळील झाडीत टाकून रिक्षाचालक पसार झाला होता. या रिक्षाचालकाला दिल्लीमधून पकडण्यात बाणेर पोलिसांना साडेचार महिन्यांनंतर यश आले.

इसाराईल मंगला गुर्जर Israel Mangala Gurjar (वय २२, सध्या रा. महिपालपूर, दिल्ली, मूळ रा. नौनेर, अमरोही, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

गोपाळ गोविंद वाघ (वय ६३, रा. ए एन पी अ‍ॅटलॉटीस, ज्युपिटर हॉस्पिटलमागे, बालेवाडी) हे २० जुलै रोजी दुपारी घरातून दुचाकी घेऊन बाहेर पडले. रात्री ७ वाजेपर्यंत घरी न आल्याने त्यांचा मुलगा अमितकुमार वाघ यांनी परिसरात चौकशी करुन बाणेर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली. त्यानंतर त्यांचे मित्र व पोलीस हे सीसीटीव्ही कॅमेर्‍याची पाहणी करीत असताना बालेवाडी फाटा येथील न्यू पुना बेकरी येथे सायंकाळी पावणेपाच वाजता गोपाळ वाघ हे रस्ता ओलांडत असताना त्यांना रिक्षाचालकाने जोरात धडक दिली. जखमी झालेल्या वाघ यांना लोकांनी उपचारासाठी रिक्षामध्ये बसवित असल्याचे दिसून आले. त्याची रिक्षा बालेवाडी फाटा येथून राँग साईडने घेऊन बाणेरच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत होते.

त्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये नेले हे समजून आले नाही. दुसर्‍या दिवशी २१ जुलै रोजी दुपारी ४ वाजता पोलिसांना रेंजहिल रेल्वे लाईनजवळ रस्त्याच्याकडेला गवतामध्ये त्यांचे वडिल बेशुद्धावस्थेत आढळून आले. डॉक्टरांनी त्यांचा मृत्यु डोक्याला मार लागल्याने झाल्याचे सांगितले. रिक्षाचालकाने त्यांना वैद्यकीय मदत करण्याऐवजी निर्जनस्थळी टाकून तो पळून गेला होता. या प्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाणेर पोलीस त्याचा व रिक्षाचा शोध घेत होते. त्यात त्याची रिक्षा सांगवी येथे बेवारस अवस्थेत आढळून आली. रिक्षावरुन त्याचे नाव निष्पन्न करण्यात आले. तो रिक्षा भाड्याने घेऊन चालवत असल्याचे आढळून आले.

रिक्षाचालक हा दिल्लीजवळील महिपालपूर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन सहायक पोलीस निरीक्षक डाबेराव, पोलीस अंमलदार शिंगे, गायकवाड, आहेर हे सतत ७ दिवस महिपालपूर परिसरात त्याचा शोध घेत होते. पुण्यातून पळून गेल्यानंतर गुर्जर याने आपला फोन व राहण्याचा पत्ताही बदलला होता. ७ दिवस शोध घेतल्यानंतर पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले. इसाराईल गुर्जर याला दिल्लीहून पुण्यात आणण्यात आले. न्यायालयाने त्याला १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक अलका सरग, सहायक पोलीस निरीक्षक के. बी. डाबेराव, रायकर, पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, प्रीतम निकाळजे, शरद राऊत, गजानन अवतिरक, प्रदीप खरात, पाथरुट आणि स्वप्निल मराठे यांनी केली आहे.

You may have missed