Pune Crime News | बिटकॉईनमध्ये गुंतवणुक करण्याच्या बहाण्याने नोकरदाराला 12 लाखांचा गंडा; शेअर मार्केट गुंतवणुकीसारखीच फसविण्याची पद्धत

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचा बहाणा करुन सायबर चोरटे दररोज अनेकांना लुबाडत असताना बिटकॉईनमध्ये गुंतवणुक केल्यास ४० टक्के नफ्याचा वायदा करुन सायबर चोरट्यांनी एकाला १२ लाख ११ हजार रुपयांना गंडा घातला आहे.

याबाबत हडपसर येथे राहणार्‍या ५४  वर्षाच्या नागरिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १२ ऑक्टोंबर ते १४ ऑक्टोंबर २०२४ दरम्यान घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना योगटाक्स या टेलिग्राम आयडीवरुन मेसेज आला. त्यामध्ये बिटकॉईन खरेदी केल्यास त्यात ४० टक्के नफा मिळेल, असे सांगितले. त्यांनी गुंतवणुकीची तयारी दर्शविल्यावर त्यांना एक लिंक पाठविण्यात आली. त्यांचा युजर आयडी तयार करण्यात आला. क्विककॉईन डॉट टॉप/ट्रेड ही वेबसाईट ओपन केल्यावर बिटकॉईनचे पेज ओपन झाले. त्यांना पहिला टास्क दिला. त्यामध्ये त्यांना ३ बिटकॉईन चॉईस करण्यास सांगण्यात आले. त्यांनी चॉईस केल्यानंतर त्याना ३ हजार रुपये पाठविण्यात सांगितले. त्यानंतर  त्यांना बिटकॉईनचे वेबसाईटवरुन बिटकॉईन खरेदी करण्यास सांगितले. त्यांनी बिटकॉईन खरेदी केल्यावर त्यांच्या बँक खात्यावर ८ हजार ३२७ रुपये जमा झाले. 

त्यामुळे यांचा विश्वास बसला. बिटकॉईन वेबसाईटवरुन सांगितल्याप्रमाणे त्यांनी एकूण १० वेळा व्यवहार करुन १२ लाख ११ हजार रुपये गुंतविले. त्यावर त्यांना १६ लाख ४५ हजार रुपये नफा दाखविला जात होता. त्यांनी विड्रॉल रिक्वेस्ट टाकली. त्यांना तुम्हाला टिडीएस भरावा लागेल, असे सांगितले. त्यांनी माझ्या रक्कमेतून कापून घेण्यास सांगितल्यावर त्यांना अगोदर पैसे भरावे लागतील. तरच तुम्हाला तुमची रक्कम मिळेल, असे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यावरुन जवळपास दीड वर्षानंतर आता हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करीत आहेत.

You may have missed