Pune Crime News | मुलीच्या शिक्षणासाठी व्याजाने घेतलेले पैसे परत दिले असतानाही आणखी व्याजाची मागणी करुन पतीला जीवे मारण्याची दिली धमकी, 4 महिलांसह 7 जणांवर सावकारी नियमनखाली गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | धुणे भांडी करणार्या महिलेने आपल्या मुलीने चांगले शिकावे, यासाठी ओळखीच्या महिलांकडून तब्बल २० टक्के व्याजाने केवळ २० हजार रुपये घेतले होते. त्यांनी व्याजासह सर्व पैसे परत केले असतानाही या महिलांनी आणखी २० हजार रुपयांची मागणी करुन त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी ४ महिलांसह ७ जणांवर सावकारी नियमन अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
कोंढव्यातील काकडे वस्तीत राहणार्या एका ४० वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सावित्री येल्लप्पा गायकवाड, येल्लपा गायकवाड, नताशा गायकवाड, पायल गायकवाड, विकास गायकवाड (सर्व रा. काकडे वस्ती, कोंढवा) तसेच एक महिला आणि पुरुषांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोंढव्यातील काकडे वस्तीमधील पवार हाईटससमोरील पत्र्याचे शेडमध्ये २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या धुणे भांड्यांची कामे करतात. आपल्या मुलीने चांगले शिकावे, यासाठी त्या प्रयत्न करीत होत्या. तिच्या शिक्षणासाठी त्यांनी त्यांनी आरोपी महिलांकडून २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. तिची गरीब व असहाय्य परिस्थिती पाहून त्यांनी तिला तब्बल २० टक्के व्याजाने पैसे दिले होते. या महिलेने व्याजासह त्यांचे पैसे परत केले होते. असे असताना जेवढे पैसे दिले होते, तितकेच २० हजार रुपये अधिक व्याजाच्या रक्कमेची मागणी त्या करत होत्या. २८ फेब्रुवारी रोजी रात्री त्याला फिर्यादी महिलेच्या घरी आल्या. त्यांच्या पतीला २० हजार रुपये अधिक व्याजाच्या रक्कमेची मागणी करु लागल्या. नाही तर तुमची गाडी घेऊन जाऊ असे म्हणून त्यांची गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रतिकार केल्यावर गाडीचे नुकसान केले. फिर्यादीचे पतीला मारण्यासाठी अंगावर धावुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
कोंढवा पोलिसांनी शांतताभंग करणे, नुकसान करणे, धमकी देणे याबरोबरच सावकारी (नियमन) अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
