Pune Crime News | बदनामीच्या भीतीने तरुणीने गळफास घेऊन उचलले टोकाचे पाऊल ! रुमपार्टनर तिघा तरुणींवर चंदननगर पोलिसांनी केला गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | रुममधील तरुणी मानसिक त्रास देऊन बदनामीची धमकी देत असल्याची सुसाईट नोट लिहून एका तरुणीने गळफास घेत टोकाचे पाऊल उचलले. चंदननगर पोलिसांनी तिच्या तीन रुममेट तरुणींवर गुन्हा दाखल केला आहे.
पायल किशोर राजगुरु (वय १९, रा. अरिहंत कॉम्प्लेक्स, महावीर सोसायटी, विठ्ठल नगर, मुळ रा. कासार अंबोली, ता. मुळशी) असे या तरुणीचे नाव आहे. याबाबत तिच्या वडिलांनी चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सबुरी संतोष काळे (वय २५), शिवानी शाम आजबले (वय २६) आणि दिपाली (सर्व रा. अरिहंत कॉम्प्लेक्स महावीर सोसायटी, विठ्ठलनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना विठ्ठलनगरमधील अरिहंत कॉम्प्लेक्समध्ये ९ मार्च रोजी सकाळी साडेसात ते सव्वा नऊ वाजेच्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल राजगुरु ही नर्सिंगच्या कोर्समध्ये पहिल्या वर्षाला शिकत होती. ती अन्य तीन तरुणींबरोबर फ्लॅटमध्ये भाड्याने रहात होती. सबुरी काळे, शिवानी आजबले या नोकरी करतात. त्यांच्या फ्लॅटमधून यापूर्वी पैसे, पर्स चोरीला गेले होते. तसेच एक मोबाईलही गेला होता. हा मोबाईल पायल हिने घेतल्याची कबुली दिली. त्यामुळे तिनेच यापूर्वीही पैसे घेतले असावेत, असा या रुममेंट तरुणींचा संशय होता. त्यातून त्या तिला विचारत होत्या. तिच्या कॉलेजमध्ये व आईवडिलांना सांगण्याची धमकी देत होत्या.
आपल्या आईवडिलांना तसेच कॉलेजमध्ये समजले तर आपली बदनामी होईल, असे पायल हिला वाटत होते. ९ मार्च रोजी त्यांच्यातील एक जण जीमला गेली होती. एक तरुणी रुममध्ये झोपून होती. तिसरी नोकरीला गेली होती. या वेळी पायल हिने सुसाईड नोट लिहून रुममधील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविले. जीमवरुन सकाळी सव्वा नऊ वाजता रुमवर आलेल्या तरुणीने हा प्रकार पाहिल्यावर पोलिसांना कळविले. चंदननगर पोलिसांनी पायल हिला खाली उतरुन रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिचा मृत्यु झाल्याचे सांगितले. तिच्या नाईट ड्रेसच्या पँटमध्ये पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली. त्यात तिने रुममधील मुलींनी तिला मानसिक त्रास देऊन तिची बदनामी करण्याची धमकी दिल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे. चंदननगर पोलिसांनी तिघींवर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दशरथ तलेदवार तपास करीत आहेत.
