Pune Crime News | कामगाराशी मजुरीवरुन भांडण ! तरुणाला चुलत भावाकडून मारहाण, बरगडी केली फॅक्चर

येरवडा पोलिसांनी चुलत भावासह पाच जणांना केली अटक
पुणे : Pune Crime News | लहान भावाचे चुलत भावाच्या कामगाराशी मजुरीवरुन भांडण झाले. या कारणावरुन चुलत भावाने व त्यांच्या मुलांनी तरुणाला दोन ठिकाणी बेदम मारहाण केली. त्यात त्याची बरगडी फॅक्चर करुन जबर जखमी केले. येरवडा पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
याबाबत वैजनाथ नानु राठोड (वय ३७, रा. रामनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी गणेश केशु राठोड (वय ३७), खुबासिंग कशु राठोड (वय ४५), नेहाल खुबासिंग राठोड (वय १९), नितीन सुभाष राठोड (वय २०), निखील सुभाष राठोड (वय २२, सर्व रा. जयजवाननगर, येरवडा) यांना अटक केली आहे. ही घटना शादलबाबत कमान आणि रामनगर येथे ३० मार्च रोजी रात्री दहा ते सव्वा दहा वाजेच्या दरम्यान घडली. (Yerawada Police)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मिस्त्रीचे काम करतात. त्यांचा चुलत भाऊ खुबासिंग राठोड यांचा व्यवसाय असून ते जयजवाननगर येथे राहतात. फिर्यादी यांचा लहान भाऊ अनिल (वय ३२) हा आठवड्यापूर्वी गावावरुन आला आहे. अनिल राठोड याचे चुलत भाऊ रामु राठोड याच्या कामगाराबरोबर मजुरीवरुन भांडण झाले. या भांडणाबाबत कामगाराने रामु राठोड याला सांगितले. यावरुन ३० मार्च रोजी रात्री दहा वाजता गणेश राठोड याने फिर्यादीला फोन करुन शादलबाबा कमान येथे बोलविले. ते व त्यांचा मोठा मुलगा प्रिन्स हे दोघे तिथे गेले. त्या ठिकाणी गणेश राठोड, खुबासिंग राठोड, नेहाल राठोड, नितीन राठोड, निखील राठोड उभे होते. काही अंतरावर त्यांचा लहान भाऊ अनिल राठोड उभा होता. त्यावेळी गणेश राठोड याने तेरे भाईने रामु के बारे मे ऐसा क्यु बोला, अशी विचारणा करुन तो फिर्यादी वैजनाथ यांना हाताने मारहाण करु लागला. पाठीमागून इतरांनी हाताने मारहाण केली. त्यावेळी अनिल हा भांडणे सोडविण्यासाठी मध्ये पडला असता खुबासिंगने त्यालाही मारहाण केली. ही भांडणे थांबल्यानंतर ते घरी निघाले. रामनगर येथे पोहचले असता तेथे सुद्धा त्यांनी वैजनाथ यांना हाताने मारहाण केली. त्यांनी ही बाब पत्नीला सांगितली. ते सर्व जण जाब विचारण्यासाठी जयजवान नगर येथे गेले. त्या ठिकाणी गणेश राठोड व इतरांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ते खाली पडल्यावर त्यांना सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या त्यांच्या पत्नी व भाऊ अनिल यांनाही त्यांनी मारहाण केली. ससुन रुग्णालयात उपचार करताना त्यांची डाव्या बाजूची बरगडी फॅक्चर झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सावंत तपास करीत आहेत.