Pune Crime News | किरकोळ कारणावरुन झालेल्या हाणामारीचा बदला घेण्यासाठी मांढरदेवी यात्रेत कोयते खरेदी करुन खुन करण्यासाठी आलेल्या चार अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पथकाने पकडले़ खुनाचा प्रकार टळला
पुणे : Pune Crime News | किरकोळ कारणावरुन डोक्यात दगड घालून जखमी केल्याच्या घटनेचा बदला घेण्यासाठी मांढरदेवी यात्रेत त्यांनी ३ कोयते खरेदी केले. कट रचून खुन करण्यासाठी येणार्या चौघा अल्पवयीन मुलांना पेट्रोलिंग करणार्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने पकडले. त्यांना वेळीच पकडल्याने एक होऊ घातलेला खुनाचा प्रकार टाळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
ही घटना हडपसरमधील लक्ष्मीमाता मंदिराजवळ नाल्यालगत १७ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री सव्वा वाजता घडली. ही सर्व मुले १७ वर्षांची असून थेऊर येथे राहणारी आहेत.
याबाबत पोलीस अंमलदार शेखर बाळासाहेब काटे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बढीरातच्या अनुषंगाने १७ मार्च रोजी गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पोलीस हवालदार प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, पोलीस अंमलदार शेखर काटे, गणेश माने हे पेट्रोलिंग करत हडपसरमधील लक्ष्मीमाता मंदिराजवळ आले. पहाटे सव्वा वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीवर चौघे जण संशयित रित्या येत असल्याने त्यांना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केल्यावर ते गाडी वळवून पळून जाण्याच्या प्रयत्न करु लागले. तेव्हा पोलिसांनी त्यांना जागीच पकडले. चौघांना गाडीवरुन खाली उतरवले. त्यांच्याकडे चौकशी करीत असताना त्यांच्यातील एक जण कमरेला हात लावून काहीतरी लपवित असल्याचे जाणीव झाली. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला कोयता होता. चौघांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे ३ कोयते व एक गीलवर मिळून आली. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यावर एका खुनाचा कट उघडकीस आला.
यातील एका अल्पवयीन मुलाच्या भावाला १५ दिवसांपूर्वी कॅम्प परिसरात हुजेब व कैफ यांनी किरकोळ कारणावरुन डोक्यात दगड घालून जखमी केले होते. त्यावेळी आजुबाजुच्या लोकांनी हे प्रकरण मिटविले होते. त्यामुळे पोलिसांकडे त्याची कोणी तक्रार दिली नव्हती. हुजेब याने अल्पवयीन मुलाच्या भावाला किरकोळ कारणावरुन गंभीर मारहाण केली होती. याचा बदला म्हणून त्याचा खुन करण्याचे गेल्या ८ दिवसांपासून सर्वांनी बसुन ठरविले होते. त्यासाठी मांढरदेवी येथे यात्रेमध्ये जाऊन त्यांनी धारदार ३ कोयते विकत घेतले. तसेच एक गिलवर देखील खरेदी केली होती.
१६ मार्च रोजी रात्री थेऊर येथे एकत्र जमुन हुजेब याचा खुन करण्याचे नियोजन त्यांनी केले. अगोदर दोघे जण जाऊन हुजेब याच्यासोबत भांडण करणार व त्यानंतर लागलीच काही अंतरावर थांबलेले उर्वरित दोघे जण तेथे येऊन सर्वांनी मिळून त्यांच्याकडील कोयत्याने हुजेब याला मारहाण करुन खुन करायचे ठरविले होते. जर काही कारणास्तव हुजेब हा पळून जाऊ लागला तर लगेच गिलवरचा वापर करुन त्याला दगड मारुन खाली पाडायचे व त्याचा सर्वांनी जवळच्या हत्याराने खुन करायचा असे ठरविले असल्याचे या अल्पवयीन मुलांनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडील ३ कोयते, गिलवर जप्त केली असून हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पेट्रोलिंगमध्ये हाती लागलेल्या अल्पवयीन मुलांना वेळीच पकडल्याने एक होऊ घातलेला खुनाचा गुन्हा टळला आहे. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करीत आहेत.
