Pune Crime News | चिडविल्याचा जाब विचारल्याने चौघांनी तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा केला प्रयत्न; कोंढवा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन 2 केली अटक
पुणे : Pune Crime News | वडिलांच्या टोपण नावावरुन चिडवल्यामुळे त्याचा जाब विचारल्यामुळे झालेल्या वादातून चौघांनी तरुणावर कोयत्याने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. कोंढवा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली असून इतर दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
साहिल दादा चव्हाण (वय २५, रा. सर्व्हे नं. ३५४, भैरवनाथ मंदिरामागे, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अक्षय राजेश बाबर Akshay Rajesh Babar (वय १९, रा. भैरवनाथ मंदिराच्या मागे, कोंढवा) आणि साहिल निलेश ढावरे Sahil Nilesh Dhavre (वय २०, रा. पर्वती दर्शन, पंचशील चौक) यांना अटक केली आहे. ही घटना कोंढवा खुर्द येथील साहिल चव्हाण यांच्या घराखाली ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री पाऊण वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साहिल चव्हाण व अक्षय बाबर हे जवळजवळ राहतात. मध्यरात्रीच्या सुमारास सर्व जण गप्पा मारत होते. साहिल चव्हाण याच्या वडिलांना टोपण नावाने हाक मारत होते. त्यावरुन अक्षय बाबर व इतरांनी साहिल याला चिडवले होते. त्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली होती. या वादाच्या रागातून अक्षय बाबर व त्याच्या मित्रांनी साहिल याला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हातातील हत्याराने साहिल याच्या डोक्यावर, पाठीवर तसेच हाताच्या कोपर्यावर सपासप वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोघांना ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील तपास करीत आहेत.
