Pune Crime News | खडकवासला येथील एकांत किनारा हॉटेलवर दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील फरार गुन्हेगार 17 महिन्यांनंतर पोलिसांच्या जाळ्यात
पुणे : Pune Crime News | खडकवासला परिसरातील एकांत किनारा हॉटेलवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारी टोळीतील काही जणांना पोलिसांनी सप्टेंबर २०२४ मध्ये पकडले होते. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे, एक कोयता अशी शस्त्रे जप्त केली होती. त्यावेळी पोलिसांच्या छाप्याच्या वेळी पळून गेलेल्या गुन्हेगाराला पकडण्यात दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाला १७ महिन्यांनंतर यश आले आहे.
महादेव श्रीरंग झाडे Mahadev Shrirang Zade (वय २१, रा. अतुलनगर, एन डी ए रोड, वारजे माळवाडी) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
मांडवी खुर्द गावाच्या स्मशानभूमीजवळ नदी किनार्यावर एकांत किनारा हॉटेल उभारण्यात आले आहे. उत्तमनगर पोलीस ठाण्यातील तपास पथक २२ सप्टेंबर २०२४ च्या रात्री गस्त घालत असताना एकांत किनारा हॉटेलवर दरोडा टाकण्यासाठी काही जण जमले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेल शेजारी अंधारात जमलेल्या टोळीवर छापा टाकला. त्यात पोलिसांनी चौघांना पकडले. चौघे जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल, दोन जिवंत काडतुस, कोयता, नायलॉन दोरी, स्क्रूड्रायव्हर असे साहित्य जप्त केले होते. पळून गेलेल्यांमध्ये महादेव झाडे याचा समावेश होता.
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, उत्तमनगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील फरार आरोपी महादेव झाडे हा घरी आला आहे. या बातमीनुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला. पुढील कारवाईसाठी त्याला उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके, पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साधना पवार, रेहाना शेख, पोलीस अंमलदार साईकुमार कारके, महेश पाटील यांनी केली आहे.
