Pune Crime News | सोन्या चांदीचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने लुटणारी परराज्यातील टोळी जेरबंद, 20 ग्रॅम सोने हस्तगत
पुणे : Pune Crime News | सोन्या चांदीचे दागिने पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने दागिने लुटून नेणार्या परराज्यातील टोळीला पर्वती पोलिसांनी जेरबंद केले आहे.
शिवकुमार विनोद साह (वय २१, रा. ग्राम पज गचिया बाजार, ता. गोपालपूर, जि़ भागलपूर, बिहार), प्रितमकुमार सुशील साह (वय २३, रा. माळवाडी, तळेगाव दाभाडे), गोविंद सुशील साह (वय २९), मदन गंगा भगत (वय २३), राजा रामबारानी यादव (वय ३२, रा. माळवाडी, तळेगाव दाभाडे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व चोरटे बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील राहणारे आहेत. त्यांच्या ताब्यात २० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड व पॉलिश करण्याचे साहित्य असा २ लाख ५० हजार ३०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
दांडेकर पुल येथील जयमहाराष्ट्र मित्र मंडळाजवळ २१ डिसेंबर २०२५ रोजी दोघा चोरट्यांनी सोन्याच्या बांगड्या पॉलिश करण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन घेऊन हातचलाखीने दोन सोन्याच्या बांगड्या चोरुन घेऊन गेले होते.
या गुन्ह्याचा तपास करताना पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पवार व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली. त्यावरुन पोलीस अंमलदार अमित चिव्हे, नानासो खाडे, राकेश सुर्वे, प्रसाद पोतदार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरुन पोलिसांनी ५ जणांना अटक केली.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, इसराईल शेख, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, अमित चिव्हे, नानासो खाडे, राकेश सुर्वे, महेश मंडलिक, प्रसाद पोतदार, शाहरुख शेख, अमोल दबडे, सूर्या जाधव, स्वप्निल घुगे, सद्दाम शेख, मनोज बनसोड, किर्ती भोसले, पोलीस मित्र दिनेश परिहार यांनी केले आहे.
