Pune Crime News | डेटिंग अ‍ॅपवरुन संपर्क करुन लोकांना लुटणारी टोळी जेरबंद ! कोंढवा पोलिसांनी 5 जणांना अटक करुन 3 गुन्हे उघडकीस

Pune Crime News | Gang that robbed people by contacting them through dating app arrested! Kondhwa police arrest 5 people and uncover 3 crimes

पुणे : Pune Crime News | जेंडर या समलिंगी डेटिंग अ‍ॅपवरुन संपर्क करुन तरुणांना बोलावून त्यांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले आहे.

राहील अकिल शेख Raheel Akil Shaikh (वय १९, रा. सोमजी डी मार्ट पाठीमागे, कोंढवा), नुहान नईम शेख Nuhan Naeem Shaikh (वय १८, रा. इसाक टॉवर, लक्ष्मीनगर, कोंढवा), शाहिद शाहनुर मोमीन Shahid Shahnur Momin (वय २५, रा. संतोषनगर, कात्रज), ईशान निसार शेख Ishaan Nisar Shaikh (वय २५, रा. अंजनीनगर, कात्रज), वाहीद दस्तगीर शेख Waheed Dastagir Shaikh (वय १८, रा. कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत वाघोली येथील एका २७ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याला ११ जानेवारी रोजी शितल पेट्रोलपंपाजवळ बोलावून घेतले. तेथून त्याला पानसरेनगर मधील भारती वेदांत इंटरनॅशनल स्कुलसमोरील मोकळ्या मैदानात नेले. तेथे त्याला मारहाण केली. त्यांच्याकडील एटीएम कार्ड घेऊन दोघे जण पैसे काढायला गेले. त्यावेळी राहिल व त्याच्या सोबत असलेल्याने त्यांच्या बोटातील २ अंगठ्या, गळ्यातील सोन्याची चैन, चांदीची अंगठी काढून घेतले. एटीएममधून १० हजार ५०० रुपये काढून घेऊन दोघे जण आले. कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन ते चौघे पळून गेले. या तरुणाचा ८० हजार ३०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला होता. त्यांनी ही बाब चुलत्याला सांगितली. त्यांच्या सांगण्यावरुन त्यांनी २० जानेवारी रोजी कोंढवा पोलिसांकडे तक्रार दिली.

आरोपीचा शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल नंबरवरुन आरोपींची नावे निष्पन्न झाली. पोलीस अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण व सुहास मोरे यांना बातमीदारमार्फत मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी राहिल शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून इतर चार जणांना पकडले. या पाच जणांना अटक करुन पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे यांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी अशा प्रकारे आणखी दोघांना लुबाडल्याचे निष्पन्न झाले.

वाघोलीतील एका तरुणाला २८ डिसेंबर रोजी शितल पेट्रोलपंपाजवळ बोलावून त्यांनी या तरुणाला मारहाण करुन त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. त्याला लोकांकडून ऑनलाईन पैसे मागविण्यास सांगितले. त्याने आईकडून व मित्राकडून आणि मामाकडून एकूण १० हजार रुपये मागवून घेतले. हे पैसे त्यांनी स्वत:कडे ट्रान्सफर करुन घेतले. त्यांच्याकडील हिर्‍याचा स्टड, मोबाईल फोन, हेडफोन, चांदीचे ब्रेसलेट, चांदीच्या बाळ्या, चांदीची चैन असा ४५ हजार ३०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला.

त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी एका सुपरवायझरला कौसरबाग येथे अडवून त्याला मारहाण करुन त्यालाही ऑनलाईन पैसे मागविण्यास सांगून मोबाईल व रोकड असा ३० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. कोंढवा पोलीस ठाण्यातील ३ गुन्हे उघडकीस आले असून आरोपींनी चोरलेले चोरीचे ३ मोबाईल, लोखंडी कोयता व गुन्ह्यात वापरलेल्या २ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पोलीस अंमलदार निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, पुष्पेंद्र चव्हाण, रशिद शेख, सुहास मोर, अमित सूर्यवंशी, सुरज शुक्ला, संतोष बनसुडे, रियाज पटेल, केशव हिरवे, शाहिद राजपुत, प्रशांत खाडे, राहुल शेलार यांनी केली आहे.

You may have missed