Pune Crime News | गँगस्टर नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदेने बनावट पत्त्यावर मिळविला शस्त्र परवाना; कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | गँगस्टर नीलेश घायवळ याने ज्याप्रमाणे पुण्यात रहात असताना अहिल्यानगरमधील बनावट पत्ता देऊन पासपोर्ट मिळवला होता. त्याचाच कित्ता त्याचा साथीदार अजय सरोदे याने शस्त्र परवाना मिळविल्याचे स्पष्ट झाले आहे.
गँगस्टर नीलेश घायवळ याने अहिल्यानगरमध्ये आपले नाव गायवळ असे दर्शविले होते. पोलिसांच्या पडताळणीत तो तेथे रहात नसल्याचे दिसून आल्यानंतरही त्याने पासपोर्ट मिळविला होता. त्याच प्रमाणे अजय सरोदे याने तो कल्याणीनगरमध्ये रहात नसताना तेथे ५ ते ६ वर्षांपासून रहातो, असे दर्शवून जानेवारी २०२४ मध्ये शस्त्र परवाना मिळविला होता़. बनावट कागदपत्रे दाखवून शस्त्र मिळविल्याप्रकरणी अजय सरोदे याच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा येरवडा पोलिसांकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. अजय सरोदे याने हा शस्त्र परवाना कसा मिळविला, याचा तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.
नीलेश घायवळ याचा साथीदार असलेल्या अजय सरोदे याला पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. चौकशीत त्याच्या घरी २०० जिवंत काडतुसे व २०० रिकाम्या पुंगळ्या मिळाल्या होत्या. याबाबत तपास करत असताना त्याच्याकडे शस्त्र परवाना असल्याचे आढळून आले. त्याची तपासणी केली असता बनावट कागदपत्रे सादर करुन तो शस्त्र परवाना मिळविल्याचे आढळून आले. आता त्यावेळी पोलीस पडताळणी कोणी केली होती. त्याच्या घरी जाऊन तपासणी केली गेली होती का?. जर तो तेथे रहात नसताना त्याला कसा शस्त्र परवाना मिळाला, याचा तपास केला जाणार आहे.
