Pune Crime News | आईच्या लॉकरमधील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन त्या जागी ठेवले नकली दागिने, भावाने दोघा बहिणींवर केला गुन्हा दाखल

Pune Crime News | Viman Nagar police register case against youth for threatening and sexually assaulting minor girl

पुणे : Pune Crime News | आईच्या लॉकरमधील आजीचा नेकलेसचा अपहार केला. आईचे सोन्याचे दागिने लॉकरमधून काढून घेऊन त्या ठिकाणी ८४ ग्रॅम वजनाचे नकली दागिने ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका भावाने आपल्या दोन बहिणींवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत हितेंद्र जयंतीलाल सोमाणी (वय ६३, रा. मीरा सोसायटी, शंकरशेठ रोड) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी निता मुंजाल भावसार (वय ६१, रा. नॅशनल सोसायटी, बाणेर, औंध) आणि हेमा रवी हलवादिया (वय ५३, रा. साम्राज्य टॉवर, मेमनगर अहमदाबाद, गुजरात) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३ जुलै २०२३ ते २० जानेवारी २०२५ दरम्यान टिळक रोडवरील भारतीय स्टेट बँक शाखेत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हितेंद्र सोमाणी यांचा ढोले पाटील रोड येथे हितेंद्र कन्सल्टन्सी ओपीसी या नावाने व्यवसाय आहे. त्यांची आई सुशिला जयंतीलाल सोमाणी यांचे ९ ऑक्टोंबर २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या आईचे स्टेट बँकेच्या टिळक रोड शाखेत बँक खाते व बँक लॉकर होते. हे बँक खाते त्यांच्या दोन बहिणी हेमा हलवादिया व नीता मुंजाल भावसार आणि आई असे जॉईन्ट खाते होते. आईचे बँक लॉकर हे फक्त दोन बहिणी ऑपरेट करत होत्या.

आईचे वय झाल्याने त्यांनी दोन्ही बहिणींना आईचे दागिने व एफ डी बाबत वारंवार विचारणा केली. तेव्हा त्यांची धाकटी बहिण हेमा हलवादिया हिने आईचे दागिन्यांची लिस्ट पाठविली. त्यामध्ये आजीचे नेकलेस, दोन बांगड्या, आईचे नेकलेस, दोन बांगड्या असे बँकेत सोने आहे, अशी लिस्ट पाठविली. काही दिवसातच आईचे निधन झाले. त्यानंतर २० जानेवारी २०२५ रोजी दोन्ही बहिणी, फिर्यादी यांचा मुलगा साहिल सोमाणी, फिर्यादी हे टिळक रोड येथील शाखेत गेले. बँकेतले लॉकर उघडून त्यातील सर्व मालमत्ता बाहेर आणण्यासाठी दोन्ही बहिणी आतमध्ये गेल्या.

लॉकरमध्ये दोन दागिन्यांच्या पेट्या व काही कागदपत्रे होती. ते घेऊन सर्व जण मीरा सोसायटीतील घरी आले. तेथे दोन्ही बहिणींचे वकील, फिर्यादींचे वकील उपस्थित होते. त्यामध्ये बंद लिफाफ्यात मृत्युपत्र, मीरा सोसायटी येथील फ्लॅटचे काही कागदपत्रे तसेच दागिन्यांमध्ये १ नेकलेस, २ बांगड्यासह, २ पाटल्या, सोनाराकडून घेतलेल्या दागिन्यांची बिले मिळून आली. त्यात आजीचा एक नेकलेस दिसून आला नाही. त्याबाबत त्यांनी दोन्ही बहिणीकडे विचारणा केली तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यानंतर काही दिवसांनी लॉकरमधून आणलेले सोन्याचे दागिने तपासणी करीता २६ जानेवारी २०२५ रोजी रविवार पेठेतील श्री सिद्धीविनायक अ‍ॅसे सेंटर यांच्याकडे दिले. त्यांनी हे दागिने बनावट असल्याचे सांगून तसे सर्टिफिकेट दिले आहे. त्यांनी दोन्ही बहिणींना एस एमएस करुन हे दागिने बनावट आहेत, असे सांगितले. तेव्हा दोघींनी त्यांना काहीच उत्तर दिले नाही.

फिर्यादी यांनी बँकेत लॉकरबाबत माहिती घेतली असता त्यामध्ये असे दिसून आले की, त्यांच्या आईच्या गैरहजेरीमध्ये बहिण नीता भावसार यांनी ३ जून २०२३ व २२ सप्टेंबर २०२३ या दोन दिवशी आईचे बँकेतील लॉकर वापरल्याचे दिसून आले. त्यावरुन फिर्यादी यांची खात्री झाली की, आईचे ओरिजनल दागिने ऐवजी त्या ठिकाणी बनावट दागिने ठेवून त्यातील आजीचे नेकलेस स्वत:च्या फायद्यासाठी काढून घेतले आहे. लॉकरमध्ये मिळून आलेल्या बनावट दागिन्यांमध्ये बांगड्या, पाटल्या, नेकलेस असा एकूण ८४ ग्रॅम वजनाचे खरे सोन्याचे दागिने होते. तेथे बनावट दागिने ठेवून दोघी बहिणींनी स्वत:च्या फायद्यासाठी फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक शिरसट तपास करीत आहेत.

You may have missed