Pune Crime News | दुचाकीला जागा देण्याच्या कारणावरुन गुंडांनी मुलगा व वडिलांना कोयत्याने मारहाण करुन जीवे मारण्याचा केला प्रयत्न; लष्कर पोलिसांनी दोघांना केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | फराळ वाटपासाठी आणलेले टेबल घेऊन जात असताना दुचाकीला जाण्यास जागा देण्यावरुन झालेल्या वादात गुंडांनी वडिल व मुलावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. लष्कर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

अथर्व अमोल बिल्लमपल्ली (वय २४, रा. कामाठीपुरा, कॅम्प) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेत अथर्व बिल्लमपल्ली आणि त्यांचे वडिल अमोल बिल्लमपल्ली (वय ५९) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

लष्कर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन आल्हान सालिद शेख Alhan Salid Shaikh (वय २२) आणि असनाना अशपाक शेख (वय ३०, दोघे रा. कॅम्प) यांना अटक केली आहे. ही घटना कॅम्पमधील आर्य वैश्य कामटी समाज येथे १५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी लष्कर भागात फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फराळ वाटपानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास अमोल आणि त्याचे वडील रिक्षातून केटरिंग व्यावसायिकाकडून घेतलेले टेबल परत देण्यासाठी निघाले होते. आरोपी खान आणि साथीदार हे दुचाकीवरुन निघाले होते. दुचाकी पुढे नेण्याच्या कारणावरुन त्यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर खान आणि साथीदारांनी रिक्षा अडवून बिल्लमपल्ली पिता-पुत्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. टोळक्याने केलेल्या मारहाणीत ते जखमी झाले. लष्कर पोलिसांनी दोघांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाचा शोध घेतला जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक विशाल दांडगे तपास करीत आहेत.

You may have missed