Pune Crime News | उज्जैनच्या महाकाल मंदिरातील महंतांना देण्यासाठी सोन्याचे हिर्‍याचे दागिने घेऊन गुजरातच्या व्यापार्‍यांनी पुण्यातील व्यापार्‍याला घातला 56 लाखांचा गंडा

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | उज्जैन येथील प्रसिद्ध महाकाल मंदिराच्या महंतांना द्यायच्या नावाखाली दोन कोटी रुपयांचे हिर्‍यांचे दागिने घेऊन त्यांना ते न देताच गहाण ठेवणार्‍या व पुण्यातील व्यापार्‍याला मारहाण करुन फसवणूक करणार्‍या गुजरातच्या दोघा व्यापार्‍यांवर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विजय ऊर्फ योगेश दशरथभाई रावल (Vijay alias Yogesh Dashrathbhai Rawal) आणि पार्थ विजय ऊर्फ योगेश रावल Parth Vijay aka Yogesh Rawal (दोघे रा. खंभात, गुजरात) अशी गुन्हा दाखल केलेल्या व्यापार्‍यांची नावे आहेत.

याबाबत विवेक अमृतलाल पटेल (वय ३६, रा. मुद्रा सोसायटी, बिबवेवाडी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कुमठेकर रोडवरील गोपी जेम्स अ‍ॅन्ड ज्वेलर्स या दुकानात १० ऑक्टोंबर २०२२ ते १५ एप्रिल २०२५ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक पटेल यांचे कुमठेकर रोडवर गोपी जेम्स नावाचे रत्न, खडे यांचे दुकान आहे. त्यांच्या सासर्‍यांच्या ओळखीने विजय रावल व पार्थ रावल हे पिता पुत्र त्यांच्याकडे आले होते. त्यांनी काही व्यवहार त्यांच्याबरोबर केले होते. त्यानंतर त्यांनी उज्जैन येथील महाकाल मंदिरांच्या महंतांना काही रत्ने, खडे, दागिने हवे असल्याचे सांगून त्यांच्याकडून २ कोटी रुपयांचा माल ते घेऊन गेले काही दिवस झाले तरी त्यांनी पैसे न दिल्याने फिर्यादी हे उज्जैन येथे जाऊन तेथील महंत यांना भेटले. त्यांनी विजय व पार्थ रावल यांना ओळखतो. पण त्यांच्याकडून आपल्याला कोणताही माल मिळाला नसल्याचे सांगितले. त्यानंतर पटेल हे गुजरात मधील खंभात येथे गेले. रावल यांना भेटल्यावर त्यांनी आपण हे दागिने गहाण ठेवले आहेत. तुम्ही ३३ लाख रुपये दिले तर तुमचे सर्व दागिने सोडवून आणून तुम्हाला देतो, असे सांगितले. त्यानुसार त्यांनी ३३ लाख रुपयांची रोकड त्यांना दिली. त्यांनी पैसे घेऊन काही माल परत केला.

अडीच लाख रुपयांची रत्ने परत केली नव्हती. शिवाय दिलेले ३३ लाख रुपये त्यांनी परत केले नव्हते. त्यांनी पुन्हा खंभात येथे जाऊन त्यांची भेट घेतली. तेव्हा त्याने आता माझ्याकडे पैसे नाहीत, तुम्ही ७ लाख रुपये द्या, तुमचा माल सोडवून आणतो व पैसे परत करतो, तसेच नवीन ऑर्डर देतो, असे सांगितले. त्यांनी आणखी ७ लाख रुपये त्यांना दिले. काही दिवस होऊन गेल्यानंतरही त्यांनी ना पैसे परत केले, ना माल सोडवुन आणून परत केला. शेवटी ते पुन्हा खंभात येथे गेले. तेव्हा त्यांनी पैसे व माल देण्यास नकार देऊन त्यांना मारहाण केली. त्यांची एकूण ५६ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक केली. अनेक महिने ते पैसे व माल परत करण्याची वाट पाहिल्यानंतरही त्यांनी परत न केल्याने शेवटी आता त्यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर तपास करत आहेत.

You may have missed