Pune Crime News | बाहेरुन हॉटेल बंद करुन आतमध्ये सुरु होते हुक्का पार्लर ! अग्निशमन दलाकडून शटरचे कुलूप तोडून स्वारगेट पोलिसांनी केली कारवाई

hookah

पुणे : Pune Crime News | शहरात अवैधरित्या अनेक ठिकाणी हुक्का पार्लर सुरु असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये दिसून येते. पण, लक्ष्मीनारायण चौकातील मोदी प्लाझा इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील एलडिनेरो हॉटेलमध्ये अजबच प्रकार दिसून आला. हॉटेलचे शटर आतून बंद होते. पोलिसांनी अग्निशमन दलाकडून शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला तर आत हुक्का पार्लर सुरु असल्याचे दिसून आले. स्वारगेट पोलिसांनी हॉटेल मालक, मॅनेजर, कर्मचार्‍यांवर कारवाई केली आहे.

एलडिनेरो हॉटेल मालक विकास मेहता (रा. चव्हाणनगर, धनकवडी), मॅनेजर सनी सुंदर परिहार (वय ३३, रा. गुलटेकडी, स्वारगेट) व हॉटेलमधील वेटर दीपक सतभूषण जैन, मोसिन दिलमोहम्मद शेख, अनमोल सरवन श्रेष्ठ, पर्वत सुरज परिहार, ढोल बहादूर परिहार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलीस नियंत्रण कक्षातून स्वारगेट पोलीस ठाण्यास कळविण्यात आले की, लक्ष्मीनारायण चौक येथील मोदी प्लाझा बिल्डिंगमधील एलडिनेरो हॉटेमध्ये हुक्का चालू आहे, खात्री करुन कारवाई करावी. त्यानुसार पोलीस निरीक्षक विकास भारमळ, पोलीस उपनिरीक्षक सुजाता जाधव, पोलीस अंमलदार टोणपे, कुडाळकर, ठोंबरे, मार्शल जाधव व साळवे हे तातडीने मोदी प्लाझा इमारतीतील तिसर्‍या मजल्यावर गेले़ एलडिनेरो हॉटेलचे शहर आतून बंद होते. शटर उघडण्यासाठी वारंवार आवाज देऊनही हॉटेलच्या आतमधून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यांनी हॉटेलच्या शटरचे लॉक तोडून दिले. पोलिसांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला असता आतमध्ये ग्राहकांकडून रोख रक्कम घेऊन त्यांना तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर ओढण्याकरीता कामगारांकरवी विक्री केली जात होती. हॉटेल मॅनेजर सनी परिहार याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने हॉटेल मालक प्रतिक विकास मेहता याच्या सांगण्यावरुन हॉटेलमधील वेटरकरवी ग्राहकांना हुक्का सेवन करण्यासाठी देत असल्याचे सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून २२ हजार ५६० रुपयांचा माल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास भारमळ, पोलीस उपनिरीक्षक सुजाता जाधव, पोलीस अंमलदार टोणपे, कुडाळकर, ठोंबरे, जाधव, साळवे यांनी केली आहे.

You may have missed