Pune Crime News | मध्य प्रदेशातील खाणीमध्ये एकाच महिन्यात तब्बल 267 बोगस कामगार दाखवून एच आर मॅनेजरने 1 कोटी 2 लाखांचा घातला गंडा
पुणे : Pune Crime News | मध्य प्रदेशातील खाणीमध्ये काम करणार्या कामगारांच्या वेतन पत्रकात जानेवारी २०२६ मध्ये २६७ बोगस कामगार दाखवून कंपनीच्या खात्यातून एच आर मॅनेजरने तब्बल १ कोटी २ लाख रुपये काढून सी एल एफ प्रोजेक्ट कंपनीला गंडा घातला आहे.
याबाबत कंपनीच्या वतीने सुनिल आनंदराव यादव (वय ६१, रा. स्कायवन, मॉडेल कॉलनी) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शैलेंद्रसिंग राठोड (रा. चतु:श्रृंगी मंदिराजवळ, मुळ रा. छावणी शिकार, राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मॉडेल कॉलनीमधील कंपनीच्या कार्यालयात १० फेब्रुवारी २०२६ रोजी घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सी एल एफ प्रोजेक्ट या कंपनीच्या मध्यप्रदेशात खाणी आहे. खाणीतून खनीज बाहेर काढण्यापूर्वी त्यावरील माती काढण्याचे काम करावे लागते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामगार लावले जातात. शैलेंद्रसिंग राठोड हा कंपनीत मानव संसाधन व्यवस्थापक (एच आर मॅनेजर) म्हणून काम करतात. या कामगारांचे पगार करण्याचे काम त्यांच्याकडे होते. शैलेंद्रसिंग राठोड यांनी जानेवारी २०२६ मध्ये कंपनीच्या वेतन पत्रकात ९०० कामगारांच्या खात्यावर त्यांचे वेतन पाठविले. याबाबत कंपनीने अंतर्गत परिक्षण केल्यावर या ९०० कामगारांपैकी २६७ कामगार हे वेतन पत्रकाच्या बाहेरील असून ते कंपनीचे कामगार नव्हते. असे असताना त्यांच्या नावे व बँक खाते कंपनीच्या वेतन पत्रकात सामील करुन घेतले. कंपनीच्या खात्यातून सुमारे १ कोटी २ लाख रुपये नव्या समाविष्ठ करण्यात आलेल्या बनावट २६७ लोकांच्या खात्यावर कंपनीच्या संमतीशिवाय पाठवून सी एल एफ प्रोजेक्ट कंपनीची आर्थिक फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील तपास करीत आहेत.
