Pune Crime News | पुणे विमानतळावर 26 कोटी 80 लाखांचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त; एअर कार्गो मधून थायलंडमधून आला मँडरिन संत्र्याच्या पल्पच्या बॉक्स मधून तस्करीचा प्रकार
पुणे : Pune Crime News | मानवाद्वारे होणारी ‘हायड्रोपोनिक गांजा’ ची तस्करी अनेकदा पकडली गेल्यानंतर आता तस्कारांनी शेतमालाच्या कार्गोमधून तस्करी करण्याचा प्रयत्न केला आहे. लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एअर कार्गोमधून आता ‘हायड्रोपोनिक गांजा’ची तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे सीमा शुल्क विभागाने २६ कोटी ८० लाख रुपयांचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त केला आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर कार्गो विभागात थायलंडहून एका आयात कंटेनरमध्ये चिनी खाद्य पदार्थ असल्याचे सांगण्यात आले होते. ‘मँडरिन ऑरेंज सॅक्स’ या नावाने हा माल पांढर्या थमाकोल बॉक्समध्ये पॅक करण्यात आला होता. संशय आल्याने सीमा शुल्क अधिकार्यांनी त्याची स्कॅनिंग केले असता मालाचे स्कॅनिग सेंद्रिय स्वरुपाचे नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर अधिकार्यांनी एक बॉक्स उघडून तपासणी केली असता त्यामध्ये सीलबंद टिनचे डबे आढळून आले. त्या डब्यांमध्ये मीठासारखा पांढर्या रंगाची दाणेदार पावडर होती. ही पावडर बाहेर काढण्यात आली. तेव्हा अधिकार्यांना व्हॅक्युम सील केलेले पारदर्शक प्लास्टिक पॅक सापडले. त्या पॅकमध्ये ‘हायड्रोपोनिक गांजा’ लपवलेला आढळून आला. त्याची तपासणी केल्यावर एकूण ७६ किलो ५८ ग्रॅम ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त करण्यात आला. या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारात २६ कोटी ८० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी सीमा शुल्क विभागाने शोध मोहिम राबवून एका आरोपीला अटक केली आहे. यातून तस्करांची टोळी उघड होण्याची शक्यता आहे.
