Pune Crime News | पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठ नागरिकाची सोनसाखळी, अंगठी काढून घेऊन तोतयाने ठोकली धुम
पुणे : Pune Crime News | पोलीस असल्याची बतावणी करुन तिघा चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला अंगावरील दागिने काढा, असे सांगून रुमालात बांधण्याचे नाटक करुन मोटारसायकलवरुन धुम ठोकली.
याबाबत माऊलीनगर येथे राहणार्या एका ६३ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कात्रज कोंढवा रोडवरील मयुरेश सोसायटीकडे जाणार्या रोडवर १० डिसेंबर रोजी सकाळी पावणेअकरा वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुध आणण्यासाठी रस्त्याने चालत जात असताना मोटारसायकलवरुन तिघे जण आले. त्यांनी हातातील डायरीमधून पेन बाहेर काढून ते फिर्यादीचे नाकाजवळ नेऊन त्यांना बोलण्यात गुंतवले. नाव लिहून घेण्याचा बहाणा करुन त्यांना तुमच्या अंगावरील सोने काढा, मी रुमालात बांधून देतो, असे सांगितले. फिर्यादी यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी व हातातील अंगठी काढली. ती घेऊन रुमालात बांधण्याचे नाटक करुन अचानकपणे ते मोटारसायकलवरुन निघून गेले. ९० हजार ५०० रुपयांची सोनसाखळी व अंगठी चोरुन नेली. सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करुन चोरट्यांचा शोध घेतला जात असून पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करीत आहेत.
