Pune Crime News | 657 ग्रॅम सोने, 26 लाख रुपये घेऊन दुकान बंद करुन सराफ बापलेक झाले फरार
पुणे / पिंपरी : Pune Crime News | सोन्याचे दागिने दुरुस्तीसाठी, सोन्याचे दागिने मोड तसेच सोने तयार करण्यासाठी रक्कम असा २६ नाख ६० हजार रुपये आणि ६५७ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन ४० हून अधिक लोकांची फसवणूक करुन सराफ बापलेक फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत एका ४६ वर्षाच्या नागरिकाने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे..त्यावरुन पोलिसांनी अंबालाल जिवाजी सोनी Ambalal Jiwaji Soni (वय ५६) रोहित अंबालाल सोनी Rohit Ambalal Soni (वय ३०, रा. विकासनगर, किवळे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार देहुरोड येथील मेन बाजारामधील सुन्धा ज्वेलर्स येथे १ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबालाल सोनी यांचे देहुरोडमधील मेन बाजारात सुन्धा ज्वेलर्स हे सराफी दुकान २०२० पासुन सुरु होते. त्यामुळे परिसरात त्यांनी विश्वास निर्माण केला होता. त्याच विश्वासातून अनेकांनी त्यांच्याकडे सोन्याचे दागिने मोड करण्यासाठी तसेच दागिने दुरुस्तीसाठी दिले होते. काही जणांनी सोने खरेदी करण्यासाठी रोख रक्कमही दिली होती. ३ फेब्रुवारीपासून त्यांचे दुकान बंद असल्याचे दिसून आले. अनेक दिवस दुकान बंद असल्याचे दिसल्यावर लोकांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. तेव्हा सोनी हे पत्नी, मुलासह सर्व परिवाराला घेऊन पळून गेल्याचे दिसून आले. लोकांनी देहुरोड पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सुरूवात केली. आतापर्यंत किमान ४० लोकांनी ६५७ ग्रॅम सोन्याचे दागिने व २६ लाख ६० हजार १५० रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. फसवणूकीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. देहुरोड पोलीस दोघाही बापलेकांचा शोध घेत असून पोलीस उपनिरीक्षक डोंगळे तपास करीत आहेत.
