Pune Crime News | वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली 26 लाखांची फसवणूक करणार्या सराईत व्हाईट कॉलर गुन्हेगाराला खडकी पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट पावत्या देऊन २६ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक करणार्या सराईत व्हाईट कॉलर गुन्हेगाराला खडकी पोलिसांनी अटक केली.
सौरभ सुहास कुलकर्णी Saurabh Suhas Kulkarni (वय ३८, रा. सदभावनानगर, रिंग रोड, नागपूर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. सौरभ कुलकर्णी याने यापूर्वी अनेकांची अशाच पद्धतीने फसवणूक केली आहे. त्याच्याविरुद्ध जालना, बीड येथेही गुन्हे दाखल आहेत.
सौरभ कुलकर्णी हा इंजिनिअर असून तो पूर्वी कॉम्प्युटर क्लासेस घेत होता. त्या दरम्यान त्याला महाविद्यालयातील प्रवेशाबाबत माहिती मिळाली होती. कॉम्प्युटर क्लासमध्ये नुकसान झाल्यानंतर तो लोकांची महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली फसवणूक करु लागला.
याबाबत पिंपळे गुरव येथील एका ५० वर्षाच्या व्यावसयिकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या मुलीने नीट परिक्षा दिली होती़ ऑगस्ट २०२२ मध्ये नीटचा निकाल लागून त्यात ती उत्तीर्ण झाली होती. सौरभ कुलकर्णी याने त्यांना फोन करुन तुमच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, असे सांगितले. त्याने महाविद्यालयाची फी १६ लाख ३२ हजार रुपये असून माझे कमिशन २० लाख रुपये असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने २७ लाखांमध्ये तुमचे काम करुन देतो, असे सांगितले. त्यांच्या मुलीला रत्नागिरी जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पडवी येथील एस एस पी एम मेडिकल कॉलेज अॅन्ड लाईफटाईम हॉस्पिटल येथे प्रवेश मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून २६ लाख ३२ हजार रुपये घेतले.
महाविद्यालयात प्रवेश झाल्याचे सांगून पैसे भरल्याचे बनावट पावत्या त्यांना पाठविल्या. बनावट व खोटे ईमेल तयार करुन त्यावरुन त्यांना प्रवेशाची कागदपत्रे पाठवून विश्वास संपादन केला. तसेच कॉलेजचे बनावट शिक्के तयार करुन ते वैद्यकीय महाविद्यालयचे आहे, असे सांगून काही शासकीय तांत्रिक कारणास्तव कॉलेज जॉईन होण्यास वेळ लागणार आहे़ आणि शक्य तेवढे लवकर कॉलेजमध्ये जॉईनिंग करण्यात येईल, अशा आशयाचे ई मेल पाठवला. पैसे देऊन बरेच महिने झाल्यानंतरही सौरभ कुलकर्णी हा कॉलेज कधी सुरु होणार याची माहिती देत नव्हता. तेव्हा फिर्यादी यांनी कॉलेजला फोन करुन चौकशी केली. तेव्हा तेथील स्टाफने त्यांना तुमच्याकडील पावत्या बनावट असून मेलही बनावट असल्याचे सांगितले. सौरभ कुलकर्णी हा मार्च २०२३ पर्यंत त्यांना झुलवत राहिला. त्यानंतरही त्याने अॅडमिशन केले नाही. त्यांचे पैसेही परत न केल्याने शेवटी त्यांनी गेल्या वर्षी २४ सप्टेंबर २०२५ रोजी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली होती.
