Pune Crime News | चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून चारचाकी गाड्या घेऊन गाडीमालकांना चुना लावणार्या भामट्यास कोरेगाव पार्क पोलिसांनी केले जेरबंद; 4 गाडया केल्या जप्त
पुणे : Pune Crime News | चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून चार चाकी गाडी मालकाकडून गाडी ताब्यात घेतल्यावर त्यावर चालक ठेवून तो त्या गाड्या भाड्याने देत असे. मात्र, गाडी मालकाला कोणताही मोबदला न देता त्यांची फसवणुक करणार्या भामट्याला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे.
सुमित सुनिल कवडे Sumit Sunil Kavade (वय २७, रा. कवडेवाडी, कोरेगाव पार्क) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने आतापर्यंत १० जणांची फसवणुक केल्याचे समोर आले आहे. दिघी पोलीस ठाण्यातही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत विशाल रामदास चौधरी (वय ३६, रा. सोरतापवाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली होती.
सुुमित कवडे हा सोशल मीडियावर जाहिरात करुन गाडी मालकांना जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवत असे. गाडी मालकांनी त्याच्याकडे गाडी दिल्यानंतर तो ती भाड्याने देत असे. त्याचा टोल चार्जही गाडी मालकावर पडत असे. मात्र, गाडीमालकाला ठरलेला मोबदला देण्यास तो टाळाटाळ करत असे. वेगवेगळी कारणे सांगून त्यांना परतावा देत नसे. त्यामुळे आपली फसवणुक होत असल्याचे दिसल्याने काही गाडी मालकांनी जीपीएस सिस्टीम तसेच टोलनाक्यावरील टोल चार्ज यावरुन स्वत:ची गाडी वाटेत ताब्यात घेतल्या आहेत. कोरेगाव पार्क पोलिसांकडे याबाबत तक्रार आल्यानंतर पोलिसांनी सुमित कवडे याचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्यांच्याकडून २ एर्टिगा , एक स्वीफ्ट, एक वॅगनार अशा ४ गाड्या हस्तगत केल्या आहेत. त्याने अशाच प्रकारे अनेक लोकांना फसविले आहे. फसवणुक केलेल्या गाड्यांबाबत माहिती घेण्याचे काम सुरु असून पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे तपास करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त संगीता अल्फासो शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे, पोलीस हवालदार प्रविण पडवळ, सचिन पवार, राहुल मोकाशी, पोलीस अंमलदार गौरव म्हस्के, राहुल वेताळ, अंकुश खंनसोळे, प्रदिप ठाकूर, सुनिल मारकड यांनी केली आहे.
