Pune Crime News | चोरट्यांकडून चोरीचे मोबाईल घेऊन दुसर्याला विकणार्या चोरट्याच्या लक्ष्मीनगर पोलिसांनी आवळ्या मुसक्या, चोरीचे 35 मोबाईल जप्त
पुणे : Pune Crime News | शहराच्या विविध भागात मोबाईल चोरी करणार्या चोरट्यांकडून मोबाईल घेऊन ते दुसर्यांना विकणार्या चोरट्याला लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीचे ३५ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
विष्णु रतनलाल मावर Vishnu Ratanlal Mawar (वय २५, रा. समाधान चौक, ससून हॉस्पिटल आऊटगेटजवळ, मुळ रा. गडअमरवरा, बामनवास, ता. जि. सवाई माधवपूर, राजस्थान) असे या चोरट्याचे नाव आहे.
पोलीस अंमलदार कादिर शेख व अतुल जाधव हे गस्त घालत असताना त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक जण शादलबाबा चौक कमानीजवळ मोबाईल विक्रीकरीता येणार आहे. या बातमीच्या अनुषंगाने त्या परिसरात सहायक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, पोलीस अंमलदार अतुल जाधव, कादिर शेख, कांबळे, अक्षय शिंदे, राहुल परदेशी, अमोल गायकवाड, सुरज ओंबासे यांनी तेथे सापळा लावला. तेथे एक जण कोणाची तरी वाट पहात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला हटकल्यावर तो कावराबावरा होऊन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. तेव्हा पोलिसांनी विष्णु मावर याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ १ सॅमसंग कंपनीचा मोबाईल आढळून आला. त्याला अटक करुन चौकशी केल्यावर त्याच्याकडील बॅगेमध्ये आणखी ३४ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल मिळाले. विष्णु मावर हा मुळ राजस्थानात केटरर्स म्हणून काम करतो. या मोबाईलबाबत चौकशी केल्यावर त्याने शहरातील वेगवेगळ्या भागात चोरलेले मोबाईल घेऊन ते दुसर्याला विकतो, असे सांगितले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चुलूमुला रजनिकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनिल जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, पोलीस अंमलदार अतुल जाधव, कादिर शेख, कांबळे, अक्षय शिंदे, राहुल परदेशी, अमोल गायकवाड, सुरज ओंबासे यांनी केली आहे.
