Pune Crime News | लक्ष्मीनगर पोलिसांनी सराईतास पकडून देशी पिस्टल व जिवंत काडतुस केले जप्त (Video)
पुणे : Pune Crime News | येरवड्यातील चिमा घाट येथे ग्राहकाची वाट पहात थांबलेल्या सराईत तरुणाला लक्ष्मीनगर पोलिसांनी पकडून त्याच्याकडून देशी पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे.
विनयसिंग विनोदसिंग बावरी Vinaysingh Vinodsingh Bawari (वय १९, रा. पोते वस्ती, मांगीरबाबा मंदिराशेजारी, येरवडा) असे त्याचे नाव आहे. विनयसिंग बावरी हा फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करतो. कर्जाचे हप्ते थकले असताना मारहाण करुन मोटारसायकल जबरदस्तीने ओढून नेल्याप्रकरणी विनयसिंग बावरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार राहुल परदेशी व अक्षय शिंदे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, येरवडा येथील चिमा घाट येथे एक जण थांबला असून त्याच्याकडे गावठी पिस्टल आहे. या बातमीची खातरजमा करुन सहायक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना याची माहिती देऊन आपल्या पथकासह चिमा घाट येथे जाऊन बाजूला थांबून पाहणी केली. तेव्हा विनयसिंग बावरी येथे थांबलेला दिसून आला. पोलिसांनी त्याला हटकल्यावर तो कावरा बावरा होऊन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. तेव्हा पोलिसांनी त्याला जागेवरच पकडले. बावरी याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटी पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळाले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चुलूमूला रजनिकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनिल जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जैतापूरकर, सहायक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, पोलीस अंमलदार अमोल गायकवाड, कादीर शेख, अतुल जाधव, सुरज ओंबासे, राहुल परेदशी, अक्षय शिंदे, कांबळे, दत्रात्रय शिंदे यांनी केली आहे.
